बारामती(वार्ताहर): ग्राहकांशी गोड बोलुन, त्यांची उठाठेव करून लाखोंच्या गप्पा मारून शेवटी विमा कंपन्यांचे एजंट विमा पॉलीसी गळ्यात मारल्याशिवाय राहत नाही. मात्र, तुमच्यावर वेळ आल्यावर तुम्हाला पाठ दाखविल्याशिवाय राहत नाही.
कोविड-19 चे संरक्षण विविध विमा कंपन्या देत आहेत. कित्येक कुटुंबियांनी भितीपोटी संपूर्ण कुटुंबाची पॉलीसी घेतली आणि निश्र्चिंत राहिले. मात्र आज कुटुंबचे कुटुंब कोरोनाने त्रस्त झालेले आहेत. अशा बिकट अवस्थेत विमा कंपन्या पाठ फिरवीत आहेत. दोन ते तीन वेळा प्रस्ताव पाठवून सुद्धा प्रस्ताव नामंजूर होत असेल तर ही विमा कंपनी म्हणायची का लूटारू टोळी असा प्रश्र्न सर्वसामान्य नागरीकांना पडलेला आहे.
विमा कंपन्यांचे एजंट ग्राहकांना खूप गोड बोलतात, लाखोंच्या गप्पा मारतात आणि सहज आपल्या गळ्यात पॉलीसी टाकून जातात. मात्र, ज्यावेळी आपल्यावर संकट येते त्यावेळी तो एजंट ती विमा कंपनी तुमच्याकडे पाहत सुद्धा नाही.
अशावेळी भावनिक झालेले कुटुंब व कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आणखीन खचला जातो. ग्राहकांनी अशा बोलघेवड्या एजंटांपासून सावध राहण्याची गरज आहे.
विमा कंपन्यांनी केलेल्या फसवणूकीची तक्रार भारत सरकारचे राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाईनच्या टोलफ्री नं.1800-11-4000 किंवा 14404 या नंबरवर आपली तक्रार नोंद करा. जर या तक्रारीबाबत 15 दिवसात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करू शकता. असे आवाहन राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे यांनी नागरीकांना केले आहे.