बारामती(वार्ताहर): वैज्ञानिक दृष्टिकोन हा समाजाच्या उन्नतीचा पाया असल्याचे मत शिक्षण शास्त्राचे तज्ञ डॉ.बाळकृष्ण बोकील यांनी व्यक्त केले.
28 फेब्रुवारी हा दिवस हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन ’ म्हणून संपुर्ण भारतात साजरा करतात . या अनुषंगाने म.ए.सो.चे कै.ग.भि. देशपांडे माध्यमिक विद्यालयात हा महिना ’सायन्स फेब्रुवारी -2021 ’ या नावाने व विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत डॉ.बाळकृष्ण बोकील यांचे ’वैज्ञानिक दृष्टिकोन’ यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यालयाचे माजी शिक्षक वि.नि.काकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे उपयोग, वैज्ञानिक दृष्टिकोनात प्रशासन, शिक्षण, समाज, शिक्षक यांच्या भूमिका व महत्व, जीवनाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची कशी गरज पडते, अंधश्रद्धेतून आपला समाज अधोगतीकडे जातो तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाज आणि पर्यायाने देश आत्मनिर्भरतेकडे कसा जातो याविषयी सखोल माहिती त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितली. ’सायन्स फेब्रुवारी-2021’ उपक्रमाअतर्ंगत सायन्स विषयावर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रयोग प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याधापक शिवाजीराव गावडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता चव्हाण, पर्यवेक्षक शेखर धायगुडे, राजाराम गावडे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय मेळकुंदे यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक उमेद सय्यद यांनी केले तर आभार सौ. रोहिणी गायकवाड यांनी मानले.