बारामती(वार्ताहर): जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झाल्यावर गुरू शिष्याची भेट ही परंपरा बंद करू नका कारण पाश्र्चिमात्य संस्कृतीमुळे विद्यार्थी व शिक्षक हे नाते दुरावले जाऊन नाते व्यवसायिक होत असल्याचे आशीर्वाद मच्छी ढावाचे संचालक पप्पू राऊत यांनी व्यक्त केले.
कोणतेही व्यक्ती जीवनात कायम विद्यार्थी असते त्यास वयाचे बंधन असत नाही त्यामुळे 17 वर्षानंतर विद्यार्थ्यांने सर्व गुरूंना एकत्रित करून अनोखा व आगळा वेगळा सत्कार करून शिक्षकांना आनंदाची अनोखी भेट प्रसंगी श्री.राऊत यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले.
देशी झाडाचे वृक्ष सवर्धन व्हावे म्हणून प्रत्येकास लिब,आंबा,चिंच,शेवगा आदी रोपटे देऊन सत्कार केला. या प्रसंगी सर्व शिक्षक, लेखनिक, शिपाई, राऊत परिवारातील सर्व सदस्य उपस्थीत होते.
बारामती येथील आशीर्वाद मच्छी ढाबाचे संचालक पप्पू राऊत हे श्री छत्रपती हायस्कुल काटेवाडी येथे दहावीला 2003 मध्ये होते परंतु घरची गरीबी त्यामुळे लहान वयात काम करावे लागत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असे त्यामुळे 5 विषय जावून नापास होण्याची वेळ आली. शालेय जीवनापासून कबड्डी खेळाची व मुलाचे संघटन करण्याची जबरदस्त आवड होती. त्यामुळे विविध ठिकाणी असलेल्या स्पर्धेमध्ये कबड्डीचा संघ उतरत असे व राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंतचे विजय खेचून आणला जाई. अभ्यासात प्रगती नाही व कबड्डी मध्ये प्रगती होत असल्याने घरच्या मंडळींनी भिगवण येथे मामाकडे हॉटेलमध्ये कामास ठेवले त्यानंतर विविध ठिकाणी काम करीत अखेर छोटेसे स्वतःचे खास मच्छी हॉटेल भाड्याच्या जागे मध्ये सुरू केले व जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यानंतर शहरातील प्रसिद्ध आशीर्वाद मच्छी ढाबा नावलौकीकास आले.
या दरम्यान कधीही गुरूंना व शाळेतील शिक्षक, लेखनिक व शिपाई यांना सुद्धा पप्पू राऊत विसरले नाही आतापर्यंत ज्यांनी विद्या दिली ते शिक्षक व लेखनिक,शिपाई असे सर्व 25 जणांना एकत्रित आणत त्यांचा खास फेटा बांधून व रोपटे देऊन सत्कार केला. आपले उच्च विचार ऐकावयास मिळाले मात्र, शालेय जीवनात काही चुकले असेल तर माफ करा अशी माफी मागून, अभ्यासात नापास झालो परंतु आपल्या संस्कारामुळे जीवनात व व्यवसायात यशस्वी झालो हे सांगून सत्काराची गुरुदक्षिणा दिली. प्रत्येकाने जीवनात यशस्वी झाल्यावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे आभार माना, काही चुकत असेल तर माफी मागा व वृक्ष संवर्धन चळवळ पुढे न्या असा मौलीक सल्ला सुद्धा श्री.राऊत यांनी दिला.
या प्रसंगी प्रत्येक शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आणि आठवणी सांगताना अश्रूंना बांध मोकळा करून दिला व एकटा विद्यार्थी शिक्षकांचे या सत्कारच्या माध्यमातून ऋण फेडतो या बदल समाधान व्यक्त केले.