सतिश ननवरे यांच्या माध्यमातून सायकल राईड लोकचळवळ रूजणार!

किल्ले परांडा 250 कि.मी. सायकल राईड यशस्वी


बारामती(वार्ताहर): नव्या पिढीला शिवविचारांची ओळख व्हावी आणि आरोग्यपूर्ण समाज निर्माण व्हावा यासाठी बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे शिवजयंतीप्रित्यर्थ बारामती-किल्ले परांडा-बारामती असा 250कि.मी सायकल राईडचे दि.14 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.

पहाटे 4.00 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान कसबा येथून मान्यवरांच्या हस्ते राईडला फ्लॅग दाखवून प्रारंभ झाला. सकाळी 6 वाजता इंदापूर येथे माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सायकल राईडचे जंगी स्वागत केले. स्वागत करून ते थांबले नाही तर सदस्यांबरोबर 5 किमी सायकल देखील चालवली. इंदापूर येथील इंदापूर सायकल क्लबचे 50 सदस्य सायकल राईडमध्ये सहभागी झाले होते.

किल्ले परांडा येथे स्थानिक गावकरी व शाहीर मंडळी यांच्यामार्फत अंगावर शहारे येथील असा किल्ले परांडा याचा ज्वलंत इतिहास सदस्यांनी समजावून घेतला. शिवजन्मापूर्वीची आणीबाणीची परिस्थिती यामुळे राजमाता जिजाऊ यांना परांडा किल्ला सोडावा लागला अन्यथा शिवजन्मभूमी किल्ले परांडा हीच असती. गर्भावस्थेतील शिवछत्रपती आणि राजमाता जिजाऊ यांचा सहवास लाभलेला किल्ला समजावून घेताना सायकल राईड मधील सर्वच सदस्य हरखून गेले होते.

परांडा शहरातील अनेक नागरिक राईडच्या स्वागतासाठी दुतर्फा उभे होते. विविध संस्था व मंडळांतर्फे सायकल राईडच्या स्वागत करण्यात आले. पॅडल फॉर ग्लोरइस हिस्ट्री या राईड पासून प्रेरणा घेऊन परांडा-शिवनेरी-परांडा सायकल राईड करणार असल्याचा मनोदय परांडा मधील सायकल प्रेमींनी व्यक्त केला .

सायकल राईडच्या परतीच्या मार्गावर निमगाव केतकी इथे नागरिकांनी मोठया उत्साहात फटाक्याच्या अतिषबाजीमध्ये सायकल राईडचे स्वागत करण्यात आले. बारामती स्पोर्ट्स फौंडेशनची सायकल राईड ही लोकचळवळ बनेल अशी चर्चा राईड मार्गावरच्या प्रत्येक नागरिकांमध्ये होती. आर्यनमॅन सतिश ननवरे आणि बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन च्या सदस्यांच्या प्रयत्नातून ही राईड यशस्वी करण्यात आली. येणार्‍या काळात 350 किल्ले सायकल वर सर करण्याचे फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे.

राईडचा सांगता समारोप बारामती कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. पुढील मोहिमेची घोषणा लवकरच करणार असल्याचे बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष आर्यनमॅन सतिश ननवरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!