बारामती(वार्ताहर): सत्ताधारी आणि प्रशासन जर सर्व सामान्य गोर-गरीब वंचितांचा आवाज ऐकणार नसतील तर बहिर्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी ‘भैरो को सुनने के लिये धमाके की जरुरत होती है असे म्हणत या लोकांना आवाज ऐकायला लावणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव यांनी सांगितले.
दि.9 फेब्रुवारी 2021 रोजी बारामती शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहर व तालुका पदाधिकारी निवड आणि मुलाखत घेते वेळी भिगवण रोड येथील ऊर्जा भवन येथे श्री.भालेराव बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हिरामण वाघमारे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची जबाबदारी ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे, सचिव अक्षय शेलार, कार्याध्यक्ष मयुर कांबळे, विक्रम थोरात, रोहित भोसले यांच्यावर सोपवण्यात आली होती.
श्री.भालेराव यांनी सत्ताधार्यांची निती समजावून सांगितली व कार्यकर्ता उपाशी न राहता त्याला रोजगार देखील कसा उपलब्ध होईल यावर ही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाची सुरुवात कसबा येथील छ.शिवाजी महाराज तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास भारिप बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमास अमोल खरात, रियाज खान,गोरखदादा कांबळे, ऍड.सोनाली मोरे यांनी मोलाचे योगदान दिले.