बारामती(वार्ताहर): एक लाख रूपयांच्या बदल्यात 32 लाख आणि 8 एकर जमीन घेणार्या सहा सावकारांविरोधात बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऍड.वैभव सुरेश काळे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अति.जिल्हा सत्र न्यायाधिश दरेकर मॅडम यांनी यातील तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती शहर पोलीस स्टेशनला नामदेव रामचंद्र ढोले यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीत महादेव (बिंटू) सांगळे यांनी 1 लाखाच्या बदल्यात 32 लाख रूपये व्याज व मुद्दल वसुल केल्याची तक्रार दिली होती. यामधील पाच आरोपींविरूद्ध भा.द.वि.कलम 223, 504,506,507 व महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 व 35 नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यातील आरोपी महादेव सांगळे यांना बारामती न्यायालयाने रेग्युलर जामीनावर मुक्त केले होते. आरोपी नामे आशा महादेव सांगळे, भास्कर काशिनाथ वणवे व दत्तात्रय राजाराम वणवे यांचा दि.25 जानेवारी 2021 रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीतर्फे ऍड.वैभव सुरेश काळे, ऍड.विवेक बेडके, ऍड.बाबाजान शेख, ऍड.रियाज खान यांनी कामकाज पाहिले तर सरकार पक्षातर्फे ऍड.नवले यांनी काम पाहिले.