बारामती(वार्ताहर): बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्री. श्रीनिवास बहुळकर यांनी बँकेची 41 वर्षे सेवा करून 31 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त झाले. सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते त्यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
श्री.बहुळकर यांच्या सेवाकाळात बँकेची उत्तुंग प्रगती झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार कृतज्ञतापूर्वक बँकेच्या सेवकवर्गाने व संचालक मंडळाने जिजाऊ सभागृह येथे आयोजित केलेला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा, नगराध्यक्षा सौ.पौर्णिमाताई तावरे, पं.स.सभापती सौ.निता बारवकर, मदनराव देवकाते, प्रशांत काटे, संभाजी होळकर, सौ.भारती मुथा, संदीप जगताप, विश्वास देवकाते इ. मान्यवरांची उपस्थिती होती.
ना.अजित पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सध्या बँकांमध्ये व्याजदराची स्पर्धा फार वाढलेली आहे. ठेवीवरील व्याजदर कमी झालेले आहेत. चांगले कर्जदार बँकांना मिळत नाही. कर्जावरील व्याजदर देखील कमी झालेले आहेत. रिझर्व बँकेकडून सहकारी बँकांना वेगळी वागणूक व स्मॉल फायनान्स बँक किवा खाजगी बँकांसाठी पोषक वागणूक असे चित्र पहावयास मिळते. बारामती बँकेने चांगली ग्राहकसेवा व व्याजदर कमी ठेऊन ग्राहक वाढविले पाहिजेत, चांगल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर बँकेचा विस्तार वाढविला पाहिजे असेही ते म्हणाले. नविन कार्यकारी संचालक श्री. रविंद्र बनकर यांना पुढील वाटचालीसाठी दादांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड यांनी केले तसेच बँकेचे सभासद शेखर कोठारी, सुर्यकांत गादिया, ऍड.करीम बागवान, संचालक ऍड.शिरीष कुलकर्णी, राजेंद्र लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर हे सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, मी जरी सेवानिवृत्त होत असलो तरी बँकेबरोबरचे माझे स्नेहाचे नाते यापुढेही कायम राहील. बँकेच्या विकासासाठी मी यापुढेही मदत व सहकार्य देत राहील व बँकेच्या भावी विकासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड, संचालक रमणिक मोता, सचिन सातव, शिरीष कुलकर्णी, देवेंद्र शिर्के, दिग्विजय तुपे, सुभाष जांभळकर, उध्दव गावडे, सुरेश देवकाते, विजयराव गालिंदे, कपिल बोरावके, डॉ.वंदना पोतेकर, सौ.कल्पना शिंदे, सौ.नुपूर शहा, प्रितम पहाडे, सतिश सालपे, कार्यकारी संचालक रविंद्र बनकर, सरव्यवस्थापक विनोद रावळ व त्यांचे सहकारी सेवक वर्ग उपस्थित होते.
बँकेचे संचालक सुरेश देवकाते यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला. बँकेच्या सर्व सेवकवर्गाचे अथक प्रयत्न व योगदानामुळे कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.