ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत माझा व्यवसाय,माझा हक्क मेळाव्याचे आयोजन

बारामती(वार्ताहर): मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कार्यक्रमाअंतर्गत माझा व्यवसाय माझा हक्क या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करुन देणा-या उपक्रमाचा प्रारंभ बारामतीत येत्या रविवारी (ता.31) होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या बाबत माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार व अतुल बेनके हे या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. विद्यानगरीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बारामती शहर व तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमानंतर फॉर्म भरुन घेतले जाणार आहेत. फिरत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार असून विविध उपयोगी कामांसाठी टाटा एस वाहने (छोटा हत्ती) उपलब्ध करुन देण्याची नावनोंदणी होणार आहे.

या प्रसंगी बारामती, शिरुर व जुन्नर करीता एकूण चार मोबाईल क्लिनिक (फिरता दवाखाना) दिले जाणार असून त्याचा प्रदान समारंभ होईल. या फिरत्या दवाखान्यांच्या (क्लाऊड बेस्ड हेल्थ किऑस्क) माध्यमातून बारामतीकरांच्या रक्तदाब, मधुमेह, कान, डोळे तपासणी, ईसीजी सारख्या विविध 50 तपासण्या विनामूल्य होणार आहेत.

या शिवाय आशा सेविकांना मास्कवाटप, कोविड योध्दयांचा गौरव व विद्या प्रतिष्ठानला कोविड यंत्रसामग्री प्रदान करण्याचाही कार्यक्रम या प्रसंगी होणार आहे.

काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम….
पाच वर्षात एक लाख सुक्ष्म, लघु उपक्रम प्रस्थापित करणे. 18 वर्षे पूर्ण तर 45 वर्षांच्या आतील व्यक्ती पात्र, अनु. जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिकांसाठी 50 वर्षे कमाल वयोमर्यादा, दहा लाखांवरील प्रकल्पासाठी सातवी तर 25 लाखांवरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ, बँक कर्ज 60ते75 टक्के, स्वभांडवल 5 ते 10 टक्के, शासन अनुदान 15 ते 35 टक्के, प्रवर्ग व संवर्ंगनिहाय बँक कर्ज, दोन आठवड्यांचे निवासी उद्योजकीय प्रशिक्षण अनिवार्य, योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती. उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई वाहतूक व व्यवसाय, फिरते विक्री केंद्र या योजनेत सुरु करु शकतात.

2 thoughts on “ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत माझा व्यवसाय,माझा हक्क मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!