साप्ताहिक वतन की लकीरची निर्भिड पत्रकारितेची गौरवशाली परंपरा पुढे घेऊन जात, शब्दांना सत्याची धार देत मराठी वृत्तपत्रात स्वतंत्र एक वेगळे स्थान निर्माण करणारे सा.वतन की लकीर, 14 व्या वर्षात यशस्वी पर्दापण करीत आहे. याचा मनोमन आनंद वाटतोच आहे. या आनंदाचे खरे भागीदार आमचे असंख्य वाचक, वर्गणीदार, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक, मित्र परिवार, खंबीर साथ देणारे कुटुंबातील आई-वडिल, भाऊ ऍड.शहानुर शेख, उपसंपादक कैश शेख, पत्नी, मुले हे आहेत.
मला सांगायला आनंद होईल ऊन,वारा, पावसाची तमा न बाळगता नियममित अंक प्रकाशित करीत आलो आहे. वर्षभरातील एकुण 52 अंकापैकी फक्त दोन अंक प्रकाशित झाले नाही. ते दोन अंक म्हणजे मार्च मधील शेवटच्या आठवड्यातील आणि एप्रिलच्या सुरूवातीच्या आठवड्यातील अंक आपल्यापर्यंत पोहचू शकला नाही. संपूर्ण जगात अज्ञात शत्रू म्हणजे कोरोना विषाणूने थैमान घातले होते. सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. या काळात ऑनलाईन बातम्या वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्राने कोरोना होतो अशा बातम्या वाचकांपर्यंत पोहचल्याने वृत्तपत्र हातात घेणे म्हणजे देणारा आपला शत्रू असावा अशी परिस्थिती होती. अशात डब्ल्यूएचओ संघटनेने वृत्तपत्राने कोरोना होत नाही असे जाहीर केल्याने सर्व वृत्तपत्र क्षेत्रातील मंडळींचा जीव भांड्यात पडला. तरीही वाचकांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रिंट मिडीयामध्ये नैराश्य आले होते. अशा वातावरणात सोशल मिडीयाने भरारी घेतली खरी मात्र, त्यावर विश्र्वासर्हाता कितपत ठेवावी याचा प्रश्र्न समोर आला. यास कुठे सुगीचे दिवस येत नाही तोवर पुन्हा एक बातमी वार्यासारखी आली मोबाईलच्या स्क्रीनवर कोरोना विषाणू कमीत कमी सहा तास राहतो. या बातमीमुळे वाचकांनी अक्षरश: मोबाईल स्क्रीन सॅनिटायझेशन करण्यास सुरूवात केली. यामध्ये कित्येक मोबाईल स्क्रीन खराब झाले तर काहींना मोबाईल अडगळीत ठेवावा लागला. असा सर्व संघर्ष करीत लॉकडाऊन काळात तारेवरची कसरत करीत वृत्तपत्र प्रकाशित करणे जिकरीचे होते. असे कडवे आव्हान समोर असताना वृत्तपत्र प्रकाशित करीत होतो व नागरीकांमध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती करून त्यांच्या मनातील भिती दूर करीत होतो. कोरोना आला मात्र त्याने जीवन कसे जगायचे, कसे वागायचे असे खूप काही शिकवले. देव तर चार भिंतीत बंद होते मात्र, माणसाच्या रूपात देव येऊन त्याने गोर-गरीब, दु:खी पिडीत व गरजुंचे अश्रु पुसले. माडीवर राहणार्यांनी सढळ हाताने मदत केली. माझ्या शेजारी असणारा उपाशी झोपता कामा नये ही भावना सर्वांच्या मनात उगम पावत होती. आपल्या घासातील घास देवून त्याची मदत करण्याचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न केला.
अशा परिस्थितीत वतन की लकीर टीमने प्रत्येक्षात घटना स्थळी जावून वृत्त टिपले, संकलन करून सत्य घटना मांडून, वृत्तातून नागरीकांच्या मनामधील कोरोनाबाबत निर्माण झालेली भिती दूर करण्याचा प्रयत्न केला. अशातच वर्क फ्रॉम होम या संकल्पनेतून माझी पत्नी सलमा हिने सा.वतन की लकीर संकेतस्थळ निर्मिती करण्याचा चंग बांधला. अल्पावधीतच तिने ुुर्.ींरींरपज्ञळश्ररज्ञळी.लेा हे संकेतस्थळ विकसीत केले आणि त्यामुळे वाचकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग सुकर झाला.
गेल्या तेरा वर्षात असं काही शिकायला मिळाले नाही ते वृत्तपत्राच्या 13 व्या एका वर्षात शिकायला मिळाले. अदृश्य शत्रूमुळे होणारे आरोग्यास परिणाम, संपूर्ण देश, राज्य, तालुके, गाव टाचणी पडेल एवढा आवाज येईल एवढी स्मशान शांतता पसरली होती हे पाहण्याचे साक्षीदार आम्ही सर्व आहोत. मी-मी म्हणणार्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती. हातावरचे पोट असणार्याची गंभीर परिस्थिती होऊन बसली होती. अशात सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, मंडळे यांनी या लोकांना मदतीचा हात दिला. विविध वस्तुंचे वाटप केले. या सर्वांना सा.वतन की लकीर वृत्तपत्रात प्रसिद्धी देवून वाटप करणार्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
आता कुठे परिस्थिती निर्वाळत असताना आर्थिक चक्राने गती धरली असताना बर्डफ्लू सारख्या रोगाने शिरकाव केला आहे. कोरोना काळात कित्येक मातब्बर लोकांना उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले याचे दु:ख मनोमन वाटते या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!
निर्भिड पत्रकारीता करताना खुप वाईट अनुभव येत असतात. तर कोण बातमी लावल्यामुळे जीवावर उठलेला असतो तर कोणाची बातमी लावली म्हणून जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो. साप्ताहिकाने एक बातमी अन्यायग्रस्ताच्या बाजुने लावली असता, चार ते पाच विरोधक तयार होत असतात. याचा कोणताही विचार न करता निर्भिड, निस्वार्थी व निपक्षपातीपणे वृत्त प्रसिद्ध करीत आलेलो आहे. न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे परखड व निर्भिडपणे वृत्त प्रसिद्ध करणारे साप्ताहिक म्हणून बारामती तालुक्यात गणले जावू लागले याचा मनोमन आनंद वाटतो. ही धार अशीच राहणार यात शंका नाही.