ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडावी – तहसिलदार विजय पाटील

बारामती(उमाका): बारामती तालुक्यात 15 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. एकूण 52 ग्रामपंचायतीपैकी 49 ग्रामपंचायतीमध्ये 430 जागेसाठी 1008 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी विविध ग्रामपंचायतीत 79 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. तरी बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील यांनी मतदारांना केले आहे.

निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायची नावे पुढीलप्रमाणे – अंजनगाव, आंबी खुर्द, ब-हाणपूर, बाबुर्डी, चोपडज, ढाकाळे, ढेकळवाडी, देऊळगाव रसाळ, गोजुबावी, घाडगेवाडी, होळ, संदोबाचीवाडी, सस्तेवाडी, जळगांव सुपे, जोगवडी, जैनकवाडी, कटफळ, कारखेल, कांबळेश्वर, को-हाळे बु. थोपटेवाडी, खंडोबाची वाडी, खांडज, लाटे, माळवाडी (लाटे), माळवाडी (लोणी), मेखळी, मोढवे, नारोळी, निंबुत, निरावागज, पिंपळी, सावळ, सांगवी, शिरवली, शिरष्णे, सोनवडी सुपे, सोनगाव, तरडोली, उंडवडी सुपे, वढाणे, वडगाव निंबाळकर, झारगडवाडी, पाहुणेवाडी, मळद, क-न्हेरी, मुर्टी, मोराळवाडी आणि खराडेवाडी.

माळेगाव खुर्द आणि वाकी या दोन ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध उमेदवार निवडले आहेत. तालुक्यात एकूण 199 मतदान केंद्र असून 1 लाख 99 हजार 202 मतदार आहेत. निवडणूक प्रक्रीया यशस्विपणे राबवण्यासाठी एकूण 27 निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. ईव्हीएम तयार करण्याचे ठिकाण आणि मतमोजणीचे ठिकाण रिक्रिएशन हॉल, भिगवन रोड बारामती येथे निश्चित करण्यात आले आहे. दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:00 वा. पासून मतमोजणीस सुरुवात होईल, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.

मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडावी. कोरोना संसर्गाच्या काळात मतदारांनी सामाजिक अंतर राखावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. आचार संहितेचे पालन करण्यात यावे.

उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन मतदारांना दाखवू नये. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळित पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थचे पालन करण्यात यावे, असेही आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!