बारामती(वार्ताहर): आजवर शेतकर्यांच्या शेतमालावर दलालांनी डल्ला मारला असून शेतकरी न्यायीक हमीभावापासून वंचित राहिला व दलालांचा विकास झाल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे कामगार नेते नंदकुमार बघेल यांनी केले.
श्री.बघेल हे वयाच्या 85 व्या वर्षी महाराष्ट्राच्या विविधअंगी विकासात्मक पाहणी दौर्यावर असताना त्यांनी बारामती शहरातील कार्यकर्त्यांशी शासकीय विश्रामगृह, पाटस रोड येथे संवाद साधला. त्यांचे राजकीय, सामाजिक, विविध पातळीवरील शेतकरी,कष्टकरी, असंघटीत कामगार व मतदार यांचे सतत भेडसावत असणारे प्रश्र्न, समस्यांवर खूप मोठे कार्य आहे.
श्री.बघेल बोलताना म्हणाले की, सध्या दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे त्यांच्या मागण्या कमी आहेत पण रास्त आहेत. केंद्र सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असून शेतकर्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. जगाचा पोशिंदा त्रस्त, दु:खी आहे. शेतकर्यांना पिकवण्याचा अधिकार आहे परंतु, विकण्याचा नाही. केंद्र व राज्य शासनाने तातडीने मध्य काढणे गरजेचे आहे. शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांचे प्रमाणे असंघटित मतदार हा देखील मोठा प्रश्र्न आहे. ईव्हिएम मशिन कालबाह्य करून येणार्या निवडणूका बॅलेट पेपर घेण्यात यावेत. नाहीतर लोकशाही जावून हुकूमशाही येईल असेही ते म्हणाले. भारत देशाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही लवकरच देशव्यापी संघर्ष न्यायीक आंदोलन उभे करुन बौद्ध धर्माचा प्रसार व भारत बौद्धमय करण्याची कृती केली जाईल अशा विविध विषयांवर बघेल यांनी विचार मांडले.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक कार्यकर्ते अजय लोंढे यांनी बोलताना सांगितले की, राज्यात अनुसूचीत जाती जमातींवर जातीवादातून हल्ले, बहिष्कार, मारहाण व शोषित पिडीतांवर अन्याय अत्याचार करणारे राज्य असल्याची ओळख झाली आहे. यामधून अन्यायग्रस्तास न्याय, पुनर्वसन, आर्थिक मदत व सहकार्य मिळत नसल्याची लोंढे यांनी खंत व्यक्त केली. फक्त पुणे विभागात 2 हजार 645 पिडीतांना समाज कल्याण विभागाकडून आर्थिक सहाय्य मिळाले नाही. चालू वर्षात पुणे जिल्ह्यात अनुसूचीत जाती जमातीच्या नऊ युवकांचा जातीयवादातून खून, हत्या झाल्या आहेत. या पिडितांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन व आर्थिक सहाय्य करण्यासाठी पैसा व वेळ नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हजारो कोटींचे पॅकेज जाहिर करून, नको त्या कामांना निधी व गती दिली जाते ही खूप मोठी शोकांतिका आहे. अनुसूचीत जाती जमातींवरील होणार्या अन्याय निवारणासाठी केंद्र व राज्य सरकारकडे नियोजन, आराखडा नसल्याचे दिसत आहे. या विषयावर बोलताना श्री.बघेल म्हणाले की, राज्यातील जबाबदार घटकांशी समन्वय व संवाद साधून अनुसूचीत जाती जमातींवरील गंभीर विषयी मार्गी लावण्यासाठी सक्रिय करु असे आश्वासन दिले.
यावेळी बहुजन मुस्लिम, लहुजी, शिव, शाहु, फुले, आंबेडकरी चळवळीतील महिला-पुरुष, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. श्री.बघेल यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्मारक पाहण्याचा आग्रह धरला व त्याठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत अभिवादन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमास कॉंग्रेस आयचे बारामती शहराध्यक्ष ऍड.अशोक इंगुले, ऍड.तुषार ओव्हाळ, अनिल मोरे, राजेश जाधव, निलेश गजरमल,बाबा बनसोडे, सुनिता रणवरे, आनंद काकडे, अमोल गांधी, संभाजी लालबिगे, शरद सोनवणे, नागेश धायगुडे, अमित सोनवणे, संजय वाघमारे, खुशाल गोपनीय भूषण मुटेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची रुपरेषा योगेश महाडीक यांनी पार पाडली व आभार अजय लोंढे यांनी मानले.