बारामती(उमाका): कृषि विभाग बारामती यांचे मार्फत दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी मौजे निरावागज येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत व्यापारी पिके अंतर्गत ऊस विकास कार्यक्रम प्रकल्पाअंतर्गत एक डोळा पध्दत, पट्टा पध्दतीचा अवलंब व आंतरपीक पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत असल्याने क्रॉपसॅप अंतर्गत महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषि सहायक ज्योती गाढवे, वाघेश्वरी बचत गटाच्या सर्व महिला तसेच इतर शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी कृषि सहायक गाढवे म्हणाल्या की, या शेतीशाळेचे दहा टप्पे असणार आहेत. त्यामध्ये पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यांबाबत महिला शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच हरभरा पीकाविषयी पेरणीपूर्व , पीकपेरणी पध्दत, पीक वाढीची अवस्था, कीड व रोग व्यवस्थापन, काढणी, मळणी, काढणीपश्चात तंत्रज्ञान, प्रक्रीया उद्योग, आधारभूत किंमत, निर्यात असे टप्पे ठरविण्यात आले आहेत. यावेळी हरभरा बीजप्रक्रीया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.यापुढे होणार्या शेतीशाळेमध्ये कृषि विभागाचे अधिकारी व कृषि विज्ञान केंद्रामधील शास्त्रज्ञ सहभागी होवून सर्वांना मार्गदर्शन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.