शेतकरी आंदोलन…

केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सलग सातव्या दिवशी शेतकर्‍यांचेे आंदोलन सुरु आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलन सुरु असतानाच केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांनी या शेतकरी आंदोलनातील अनेकजण शेतकरी वाटत नसल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या आंदोलनामागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप केला आहे. मागील सात दिवसांपासून हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी या कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. त्याचदरम्यान व्ही. के. सिंह यांनी केलेल्या या वक्त्यामुळे आता शेतकरी आंदोलनावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे.

व्ही. के. सिंह यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना, फोटोंमधील अनेकजण शेतकरी वाटत नाहीत. जे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे सरकारने तेच केले आहे. शेतकर्‍यांना कृषी कायद्याची काहीच अडचण नाहीय. ज्यांना आहे ते शेतकरी नसून इतर लोक आहेत. या आंदोलनामागे विरोधी पक्षांबरोबरच कमीशन मिळणार्‍या लोकांचाही हात असल्याचे ते सांगत आहे.

व्ही. के. सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर इतर राजकीय पक्षांनी या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. आम आदमी पार्टीने, शेतकरी आहोत हे दाखवण्यासाठी आंदोलकांनी नांगर आणि बैल घेऊन आले पाहिजे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सुरुवातीपासूनच आपचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे.

पाच सदस्यांची समिती नेमून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव 35 शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे केंद्र सरकारने विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून, त्यांचे आंदोलनही कायम आहे. शेतकर्‍यांशी पुन्हा चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार असून, आता 3 डिसेंबरला बैठक बोलावण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बैठकीनंतर दिली.

शेतकरी रात्र-दिवस राबून, कष्ट करून धान्य पिकवीत असतो. त्याची प्रतिमा मलीन करण्याचे काम जर असे सिंग सारखे करीत असतील तर शेतकर्‍याचा कणा मोडण्याचे काम कोण करीत आहे हे दिसून येत आहे. ज्यावेळी कायदा मंजूर होतो आणि त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होते त्यानंतर त्या कायद्यातील त्रुटी वेळोवेळी कळीत असतात त्याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!