पत्रकारांनी कोणावरही विसंबून किंवा अवलंबून न राहता आता आत्मनिर्भर झाले पाहिजे – एस.एम.देशमुख

बारामती(वार्ताहर): पत्रकारांनी कोणावरही विसंबून किंवा अवलंबून न राहता, आता आत्मनिर्भर झाले पाहिजे असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची महत्वाची सभा दि.22 नोव्हेंबर रोजी बारामती येथील कृषी विज्ञान भवनात पार पडली यावेळी श्री.देशमुख बोलत होते.

कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख सौ.सुनंदाताई पवार, टीव्हीजेएचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद जगदाळे, शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, महिला आघाडी प्रमुख जान्हवी पाटील, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, बारामती तालुकाध्यक्ष हेमंत गडकरी, परिषदेचे ज्येष्ठ सदस्य नरसिंह चिवटे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे श्री.देशमुख म्हणाले की, मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. 3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचा 81 वा वर्धापन दिन राज्यभर उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात येणार आहे.

राज्यातील 43 पत्रकार कोरोना विषाणूचे शिकार झाले. 350 पत्रकार पॉझिटीव्ह झाले. या पार्श्र्वभूमीवर पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे स्थानिक डॉक्टरांच्या समन्वयातून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावेत आणि त्यात कोरोना चाचण्याबरोबरच अन्य चाचण्या देखील करण्यात याव्यात अशा सूचना देशमुख यांनी प्रत्येक तालुका आणि जिल्हा संघांना केल्या आहेत.

प्रत्येक गोष्टीसाठी पत्रकारांनी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. परिषदेशी जोडलेल्या तालुका आणि जिल्हा संघांनी आपले निधी ऊभारून त्यातून येणार्‍या व्याजातून आपल्या तालुक्यातील किंवा जिल्हयातील गरजू पत्रकारांना मदत करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना काळात विविध जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी गरजू पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स, औषधी, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करून संघटनेची गरज अधोरेखित केली त्याबद्दल श्री.देशमुख यांनी पत्रकार संघांचे कौतुक केले. ज्या पत्रकारांचे निधन झाले अशा पत्रकारांना डॉ. श्रीकांत शिंदे फौडेशने तसेच अन्य संस्थांच्या माध्यमातून परिषदेने मदत मिळवून दिल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

सरकारने वैद्यकीय सहाय्यता कक्ष लवकर सुरू करावा त्याचे प़मुख म्हणून मंगेश चिवटे यांची नियुक्ती करावी, अधिस्वीकृती समित्यांचे त्वरित पुनर्घटन करावे अशा मागण्या विनोद जगदाळे यांनी सत्काराला उत्तर देताना केल्या. तर मंगेश चिवटे यांनी बारामतीतील दोन आजारी पत्रकारांना डॉ.श्रीकांत शिंदे फौडेशनच्यावतीने आर्थिक मदतीचे चेक अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी विनोद जगदाळे, मंगेश चिवटे यांचा एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!