बारामती(वार्ताहर): बारामतीत मागासवर्गीय भागातील समस्या मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने नुकतेच मुख्याधिकारी किरणराज यादव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर जिल्हाध्यक्ष बापू शेंडगे, जिल्हा संघटक आबासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष उमेश भोंडवे, नितीन थोरात, राहुल कांबळे,जगन चिंचकर, आप्पा निकाळजे,महंमद शेख, सचिन सकट इ.पदाधिकारी उपस्थित होते.
बारामतीचा विकास पाहता कोणीही या विकासापासूच वंचित राहिले नसेल हे बाहेरून दिसत असले तरी बारामतीत बर्याच भागामध्ये विशेषत: मागासवर्गीय भागामध्ये अनेक नागरिकांच्या समस्या, मागण्या हे अद्याप प्रलंबित आहे.
मागासर्वीय भागातील विविध समस्या मार्गी लावण्यात याव्यात याकरीता महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी, झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात झोपडपट्टीवासियांच्या समस्या सोडवत असताना स्थानिकांना विचारात घेऊन सोडविण्यात याव्यात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातूनच त्या सोडविण्यात याव्यात. प्रधानममंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या सर्व्हे घेऊन प्रत्येकाला घरकुल योजनेचा लाभ मिळवा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतमधील विस्थापित झोपडपट्टीवासियांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात. त्यांना तात्काळ 500 स्क्वे फुट घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. बानप केलेल्या ठरावाप्रमाणे महापुरुषांचे पुतळे तात्काळ बसविण्यात यावे. बानप ने केलेल्या ठरावाप्रमाणे मांग- गारुडी समाजाला समाजमंदिर बांधून मिळावे. बारामती शहरातील मुस्लिम समाजाचा शादीखाना, दफनभूमी या सारख्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात. बारामती शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया, मलेरिया या आजारावरती कोणत्याही उपाययोजना आपल्याकडून होताना दिसत नाहीत. त्या तात्काळ करण्यात याव्यात. बारामती शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यात यावा .
माहिला बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या सर्व योजनांची माहिती महिला बालकल्याण, बारामती विभागात दर्शनी भागात लावण्यात यावी. इ. मागण्यांचे निवदेन देण्यात आले आहेत.
या मागण्यांची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात व केलेल्या उपाययोजनांचा आढावा शासन नियमानुसार उलटटपाली कळविण्यात यावा. अन्यथा पुढील काही दिवसात कार्यालयासमोर लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.