बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता वाढीव हद्दीत वीज वितरण कंपनीने बेकायदेशीर खोदाई सुरू केली असल्याची तक्रार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांना दि.28 ऑक्टोबर रोजी दिलेली आहे.
तांदुळवाडी, रूई, जळोची इ. ठिकाणी वीज वितरण कंपनीने भूमिगत वीज पुरवठा करण्यासाठी खोदाई सुरू केली आहे. मात्र, सदरची खोदाई करण्यासाठी बारामती नगरपरिषदेने कोणतीही परवानगी दिलेली नाही. बेकायदेशीरपणे कंपनीने खोदाई सुरू केली आहे. त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता, सहा.अभियंता व ठकेदारावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे.
बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत एखाद्याने फळाचे, भाजीचे किंवा इतर विक्री करण्याचे दुकान लावले, मंडप टाकला, रस्ता खोदला तर त्या कष्टकरी, गोरगरीबांवर नगरपरिषद तातडीने कारवाई करून दंड लावून संबंधित विक्रेत्याच्या वस्तु, वजनकाटा इ. जप्त केला जातो.
आज राजरोसपणे वीज वितरण कंपनी कित्येक किलोमीटरची खोदाई करूनही नगरपरिषदेचे मुख्याधिकार्यांनी किंवा संबंधित क्षेत्रिय अधिकार्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही याचे खेद वाटतो. सदर खोदाई करणार्यांवर तातडीने कार्यवाही न केल्यास योग्य त्या ठिकाणी न्याय मागावा लागेल असेही तक्रारी अर्जात नमूद केले आहे. या तक्रारी अर्जाची प्रत अधिक्षक अभियंता, बारामती ग्रामीण परिमंडळ वीज वितरण कंपनी व उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या आहेत.