आयेशा मशिद असताना, अंजुमन(मदरसा) करण्याचा अट्टाहास कोणाचा?

बारामती(वार्ताहर): मागील 22 ऑक्टोबरच्या अंकात इंदापूर रोड लगत असणार्‍या यादगार सिटीत, मदरसा असल्याची नोंद वक्फ बोर्डला असताना, मात्र याठिकाणी चक्क मशिद सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. भिगवण रोड लगत सहयोग सोसायटी समोर आयेशा मशिद असताना काही विघ्नसंतोषी व ट्रस्टी होण्याचे वारे डोक्यात असणार्‍यांनी सदर ठिकाणी मशिद नसून अंजुमन (मदरसा) असल्याचे ठिकठिकाणी शासन दरबारी लेखी अर्ज करून कळविले आहे.

प्रथमत: मशिद कशाला म्हणतात हे जाणून घेऊ या.. ज्याला मिनार असतात, त्याठिकाणी पाच वेळा अजान (बाग) दिली जाते. धर्मगुरू असतात त्याठिकाणाला मशिद म्हटले जाते. ज्याठिकाणी मुले अरबी, उर्दू व इतर भाषांचे ज्ञान अवगत करतात, इस्लाम धर्माचे आचरण कसे करतात इ. शैक्षणिक पद्धतीने ज्ञान ज्याठिकाणी दिले जाते त्यास अंजुमन (मदरसा) म्हटले जाते.

मदरसा करण्याचा अट्टाहास का? हे जर पाहिले असता बारामती येथील मदरसा दारूल ऊलूम मौलाना युनूसीयामध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार काही लोकांनी केला. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नोटीसा सुद्धा या भ्रष्टाचार करणार्‍यांना लागलेल्या आहेत.

मुस्लीम समाजातील नागरीक लहान मुले अरबी, उर्दू व इतर भाषांचे ज्ञान घेतात, त्याठिकाणी त्यांचे पालनपोषण उत्तम होते या उद्देशाने स्वत:च्या कमाईतील भर उन्हात कष्ट करून काही रक्कम या मदरसा साठी दान करीत असतात. मात्र, मदरसाचा कारभार पाहणार्‍यांनी आलेल्या रक्कमेचा हिशोब ठेवणे गरजेचे असताना, अशा ठिकाणी भ्रष्टाचार करून स्वत: गडगंज झालेले दिसत आहेत. एका वर्षाचा वार्षिक जमा-खर्च 43 लाखाचा दाखवीत असतील तर सन 2006 पासुनचा हिशोब अधिकृत चार्टंड अकौंटंट यांचेकडून तपासणी केला पाहिजे होता.

असाच प्रकार भिगवण रोडलगत असणार्‍या आयशा मशिदीच्या जागी अंजुमन (मदरसा) असल्याचे भासविणार्‍या काही लोकांनी केलेला आहे. समाज कधी जागृत होणार अशा भ्रष्टाचार करणार्‍यांना कधी जाब विचारणार, का असाच बुक्क्यांचा मार सोसत राहणार असेही समाजात बोलले जात आहे.

मागील अंकात इंदापूर रोड लगत असणार्‍या यादगार सिटीत, मदरसा असल्याची नोंद वक्फ बोर्डला असताना, मात्र याठिकाणी चक्क मशिद सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. तातडीने त्याठिकाणी मशिदीचे फलक काढण्यात आले असल्याचे कळते. जर मदरसा याठिकाणी सुरू असता तर मशिद असल्याचा फलक कशासाठी काढण्यात आला, हा मुस्लीम समाजाला पडलेला प्रश्र्न आहे.

समाजातील काही मंडळी स्वत:च्या स्वार्थासाठी लाळघोटेपणा किंवा दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पित असतात अशा लोकांनी भ्रष्टाचार्‍यांना साथ देण्यापेक्षा प्रथमत: मदरश्यात झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती करून घ्यावी नंतर प्रतिक्रिया द्यावी. नाहीतर संपूर्ण जीवन यांचे हुजरेगिरी करण्यामध्ये जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!