लोणावळा (वार्ताहर): खंडाळा महामार्ग पोलिसाच्या प्रसंगावधनामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मोठा अनर्थ टळला. वाहन चालक जे.व्हे रामना यांचे प्राण वाचले. या प्रकरणातून नुसतेच दंड करणारे पोलीस नसतात, तर तुमची काळजी घेणारे सुद्धा पोलीस असतात असे दिसून आले.
शनिवार व रविवारमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा हद्दीत वाहतूक नियमनासाठी विशेष मोहीम बंदोबस्त सुरू असताना बॅटरी हिल येथील पॉईंटवर कर्तव्य बजावणारे पोलीस शिपाई नवनाथ पवळे यांना एक इर्टिका चारचाकी वाहन (क्र.एमएच 48 एके 5122) ही कमी वेगात इकडे तिकडे वळण घेत येत असल्याचे दिसले. श्री.पवळे यांना संशय आल्याने त्यांनी सदरचे वाहन थांबवले. वाहन चालवीत असलेले जे.व्हे रामना नावाचे वयस्कर गृहस्त होते.
रामना यांना काहीतरी त्रास होत असल्याचे दिसताच श्री.पवळे यांनी त्यांना खाली उतरवत पाणी पिण्यास दिले, चॉकलेट खाण्यास दिले. वाहन चालवत असताना रामना यांना मधुमेहाचा त्रास झाल्याने ते अस्वस्थ झाले होते, त्यांना चक्कर येत होती. द्रुतगतीवर घाट परिसर असल्याने ते त्याच स्थितीमध्ये वाहन चालवत होते.
श्री. पवळे यांच्या सतर्कतेमुळे वाहन चालक रामना यांचे प्राण वाचले. चालकाला पाणी, चॉकलेट व प्राथमिक उपचार केले. थोडावेळ आराम करायला लावला व बरे वाटत असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना पुढे पाठवून दिले. भुईंज पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सातार्याचे नवनाथ पवळे यांच्या सतर्कतेमुळे चालकाचे प्राण वाचल्याने व होणारी दुर्घटना टळल्याने सर्वत्र श्री.पवळे यांचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी श्री.नवनाथ पवळे यांचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.