भिगवण(प्रतिनिधी-हेमंत भोसले): भिगवण गावाच्या हद्दीत व व्यापारपेठेत रस्त्यावर बेशिस्तपणे ‘नो पार्किंग’मध्ये वाहन पार्क करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी दिली आहे.
भिगवण हे गाव राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने मोठी बाजारपेठ आहे. शैक्षणीक व व्यापारी संकुले, हॉटेल आहेत. यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. नागरीक ठिकठिकाणी आपले दुचाकी तसेच चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे तसेच बेकायदेशीरपणे दिसेल त्या ठिकाणी पार्क करत असल्याने वाहतुक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
भिगवण पोलीसांकडून वेळोवेळी वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत असते. चालकाची सुरक्षितेचा विचार करीत, भिगवण गावाला लागून राष्ट्रीय महामार्ग असल्याने विमा नसलेली वाहने आणि हेल्मेट नसलेल्या टू व्हीलरवर पुढील काळात करडी नजर ठेवणार असल्याचेही श्री.शेंडगे यांनी बोलताना सांगितले.
अशा बेशिस्त वाहनांवर ऑनलाईन दंड ठोठावण्यास सुरूवात केली आहे. गेली दोन दिवसांपासून दंडात्मक कारवाईचा धडाका लावल्याने, काही प्रमाणात बेशिस्त वाहन चालकांनी धसका घेतलेला दिसत आहे. यापुढे नागरीकांनी आपली वाहने बेकायदेशीरपणे व वाहतुकीस अडथळा होईल याप्रमाणे न लावता योग्यरितीने पार्क करावेत, असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे तसेच पीएसआय अनंत वारगड, गणेश करचे, भोंग मॅडम, रणजीत मुळीक यांनी केली.