बारामती(प्रतिनिधी) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमासाठी म्हसोबानगर येथे दाखल झाले आहेत.
कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अभ्यासक्रमानुसार हा कार्यक्रम आयोजित केला आहे. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, प्राचार्या जया तिवारी,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी डी.आय.नॉमिनी डॉ.टी.बी. देवकाते, कार्यक्रम समन्वयक प्रा.निळकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.शिवानी कोकरे-देसाई, डॉ.मयूर पिसाळ, डॉ.देवकाते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी गावात वास्तव्यास राहून ग्रामीण जीवनशैली, शेती पद्धती, पशुपालन, कृषी व्यवसाय तसेच शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत. याशिवाय विविध कृषी सर्वेक्षणे, मृदा परीक्षण, शेतकरी मार्गदर्शन, जनजागृती कार्यक्रम व कृषी तंत्रज्ञान प्रसार यांद्वारे ग्रामीण विकासासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहेत. कृषिदूत म्हणून अथर्व पलांडे, सोहम क्षीरसागर, रामकृष्ण सोलंखे, सयाजी लांडगे, यश कुंभार आणि चैतन्य ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.
म्हसोबानगर ग्रामस्थांनी कृषिदूतांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देत गावाच्या कृषी विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून गावातील शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे.