समाजातील वंचित, दुर्लक्षित व शोषितांसाठी काम करणार्‍या सौ.शार्मिला(वहिनी) पवार

                आपल्या संस्कृतीत माता-पिता, गुरूजन, मातृभूमी यांच्याप्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाने समाजातील गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करावी, अशी शिकवण आपली संस्कृती देते.  याच प्रमाणे समाजातील काही संस्था, व्यक्ती या दृष्टीने जागरूकपणे कार्य करीत असतात आणि जाणीवपूर्वक सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच प्रकारे शरयु फाऊंडेशन व या फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला (वहिनीसाहेब) पवार या आहेत. 1 ऑक्टोबर त्यांचा वाढदिवस सर्व तळागाळातील मंडळी मोठ्या उत्साहाने, तन-मनाने साजरा करतात त्यानिमित्त थोडेसे…

                कोणालाही वाटते एखादे चांगले काम केल्यावर यशस्वी व्यक्तींची शाब्बासकीची थाप पाठीवर मिळावी. ती शाब्बासकीची थाप देणार्‍या वहिनीसाहेब आहेत. हुशार पण आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणार्‍या त्या आहेत. गोर-गरीब, दु:खी-पिडीत व आर्थिक दुर्बल घटकातील पिसलेल्या लोकांच्या जवळ जावून त्यांच्या व्यथा जाणून  त्यांना जगण्याची, झगडण्याी व यातून सावरण्याची इच्छाशक्ती निर्माण करणार्‍या वहिनीसाहेब आहेत. चंदनासारखा आनंद ते सर्वांना वाटत आले आहेत. यामुळे या आनंदाचा सुगंध स्वत:बरोबर दुसर्‍यांनाही देण्याचे काम ते करीत आलेले आहेत. समाजातील वंचित, दुर्लक्षित व शोषितांसाठी शरयु फाऊंडेशन व सौ.शर्मिलावहिनी काम करीत आले आहेत व करीत आहेत.

                शरयु फाऊंडेशनच्या माध्यमातून ओढे-नाले खोलीकरण, विहिर खोदाई इ. शेतकर्‍यांच्या मुलभूत गरजांचा विचार करून, शेतकर्‍यांच्या प्रपंचाला हातभार लावण्याचे काम वहिनीसाहेब करीत आले आहेत. शेतकर्‍यांबरोबर बेरोजगार, विद्यार्थी, युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरीक या सर्वांना आपुलकीचा आधार देणार्‍या वहिनीसाहेब आहेत. जलसंधारणा बरोबर पर्यावरणाचे संवर्धन करण्यामध्ये त्यांनी सतत आघाडी घेतलेली आहे. कन्हेरी गावातील वनविभागात अठराशे वृक्ष लागवड केली. लॉकडाऊन काळात कन्हेरी-काटेवाडी ओढ्याचे खोलीकरण व रूंदीकरण काम स्वत: थांबून करून घेतले. यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर जो आनंद ओसंडून वाहत आहे तो कशातही मोजता येणार नाही. जमिनीवर राहुन यशाचे शिखर कसे गाठायचे हे वहिनीसाहेबांकडून शिकावे तेवढे कमीच आहे. माणुस कितीही श्रीमंत असला तरीत्याची खरी ओळख मनाच्या श्रीमंतीवरून होते. प्रत्येक गावाशी तेथील मातीशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. प्रत्येकाला आपला समजून प्रेम, सहकार्य व मार्गदर्शन करीत आलेल्या आहेत.

                कोरोना सारख्या जागतिक महामारीत नागरीकांना धीर देण्याचे काम त्यांनी केले.  प्रत्येक नागरीकांचे या अदृश्य शत्रूशी संरक्षण व्हावे, प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून त्यांनी मोफत औषध वाटप केले.

                वहिनीसाहेबांनी शरयु फाऊंडेशनच्या माध्यमातून जो वटवृक्ष लावला आहे, तो गगन भरारी घेत आहे. प्रत्येकाच्या मनाला भावनारे, आपलेसे वाटणारे शरयु फाऊंडेशन आहे. याच आमच्या खासदार, आमदार असल्यासारख्या आहेत असे वहिनीसाहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती मनसोक्तपणे बोलत असतो. शार्मिला पवार या नावाच्या पुढे आमदार शब्द ज्याप्रमाणे भारदस्त दिसेल त्याच प्रमाणे तो शब्द प्रत्येकाच्या मनाला भावेल ही इच्छा सुद्धा त्यांचे प्रेमी व्यक्त करीत असतात.   सुख-दु:ख, अडीअडचणीच्या वेळी मार्ग दाखविणार्‍या व धीर देणार्‍या शर्मिलावहिनी आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं म्हणतात. पण काही यशस्वी स्त्रियांमागे खंबीरपणे उभं राहून त्यांची साथ देणारे पुरुषही असतात. अशाच प्रकारे शर्मिला वहिनींच्या मागे श्रीनिवास(बापू) आहेत.

                अशा बहुअंगी, विकास रूपी, सर्वांना सामावुन घेणार्‍या, मदतीचा हात देणार्‍या, सौ.शर्मिला (वहिनीसाहेब) पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

– तैनुर शेख, संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!