बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती (प्रतिनिधी): बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री व घरपोच औषध देणे बंद करावे या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या बंदला बारामती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि औषध व सौदर्य प्रसाधने अधिनियम 1945 याअंतर्गत कोणताही स्पष्ट कायदेशीर आराखडा तयार न करता औषधांची ऑनलाईन विक्री होत होती. उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल असुन, अशा औषध विक्रीस स्थगिती सुद्धा दिलेली असताना सुद्धा सर्रासपणे ऑनलाईन विक्री होत होती. केंद्र व राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत होते. कोरोना काळात परिस्थितीचा आढावा घेत सरकारने 26 मार्च 2020 रोजी जीएसआर काढून होमडिलीव्हरी बाबत विशेष सूट दिली होती. 5 वर्ष झाले कोरोना जावून तरी सुद्धा जीएसआर जसाच्या तसाच आहे. संघटनेने सरकारने प्रसिद्ध केलेले जीएसआर रद्द करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे.

किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडे मिळणाऱ्या औषधांवरील 10 ते 20 टक्के सवलतीच्या तुलनेत ऑनलाइन औषध विक्रीवर तब्बल 30 ते 40 टक्क्यांची सवलत ग्राहकांना मिळत आहे. मात्र त्यातील आरोग्यविषयक धोके आणि रूग्णांची होऊ शकणारी फसवणूक टाळण्यासाठी देशभरात विरोध केला आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील अनेक छोटे व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. संपूर्ण भारत देशातील 12.50 लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे व बंद होण्याच्या मार्गावर आहे.

बारामती तालुक्यात या बंदचा परिणाम दिसून आला. बाजार, वर्दळीचे रस्ते अशा विविध ठिकाणी असणारी लहान-मोठी औषध विक्रीची दुकाने कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. एखादे किरणा मालाचे दुकान बंद असले तर पर्यायी उपलब्ध होते. मात्र, औषधाचे दुकान बंद असेल तर हा प्रश्न आरोग्याशी किंवा जिवाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे सरकारने या औषध विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लावावा असेही सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात होते.

सरकारने ड्रग प्राईज कंट्रोल ऑर्डर (डीपीसीओ) 2013 अंतर्गत 16% एवढा नियंत्रित केलेला नफ्याची तरतुद मागे घ्यावी. औषध विक्रेत्यास डॉक्टरने लिहिलेल्या औषधासारखी अनेक ब्रँड सबटीट्यूट औषधी देण्याचा अधिकार दिल्यास औषध विक्रेते ही स्पर्धेला उत्तर देऊन सक्षमपणे कार्पोरेट कंपन्यासोबत लढा देऊ शकतील असेही संघटनेचे म्हणणे होते.

या बंद पुकारण्यामध्ये बारामती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष युवराज यादव, उपाध्यक्ष प्रितम शिंगाडे, सचिव-अशोक ओसवाल, जिल्हा उपाध्यक्ष भारत मोकाशी, सीएपीडी मेंबर सूर्यकांत खटके, खजिनदार सत्यवान खैरे, माजी अध्यक्ष योगेश तावरे, सल्लागार समिती अध्यक्ष राहल इंगुले व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!