नगर परिषद कर्मचाऱ्याच्या निषेधार्थ परंडा शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; निलंबनाची मागणी, निलंबन न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

परंडा(प्रतिनिधी): जातीवाद हा मानवी हक्काचे उल्लंघन असल्याचे शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांना माहिती असताना सुद्धा परंडा नगर परिषद कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे यांनी जातीवाचक अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या. या निषेधार्थ शनिवारी (दि.9 मे) परंडा शहर बंद ठेवण्यात आले.

श्री.सोडगे यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अंतर्गत कारवाई करण्यात यावी. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवेचा संपूर्ण इतिहास सेवा पुस्तिकेत नोंदवला जातो. श्री.सोंडगे यांनी जातीवाचक अपशब्द वापरलेबाबत सेवा पुस्तिकेत नोंद व्हावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

शहरातील मुख्य बाजार पेठ मंडई पेठ, टिपू सुलतान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा फुले चौक सह शाहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.

समस्त मुस्लिम समाज व नागरिकांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत संबंधित कर्मचारी जगदीश सोंडगे यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. 26 एप्रिल रोजी परंडा शहरातील नागरिक व पत्रकार निसार मुजावर यांनी शहरात दोन-तीन दिवसांपासून कचरा घंटागाडी आली नसल्याबाबत मोबाईलवरून विचारणा केली असता, नगर परिषद कर्मचारी जगदीश सोंडगे यांनी अश्लील भाषेत बोलून जातीवाचक शिवीगाळ केली होती. या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परंडा हे सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने नांदणारे शांतताप्रिय शहर असून, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी जाती-धर्मावरून अपमानास्पद भाषा वापरणे ही गंभीर बाब असल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

या प्रकरणी यापूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही निलंबनाची अथवा कठोर कारवाई न झाल्याने मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी परंडा शहर बंद ठेवण्यात आले असून, संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मोठया संखेने मुस्लीम बांधव उपस्थित होते. या बंदला शहरातील व्यापारी, मुस्लिम समाज आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!