बारामती(प्रतिनिधी): स्व. अजितदादांचे विमान अपघातात झालेल्या दुर्देवी घटनेनंतर रिक्त जागी 201 बारामती विधानसभा पोटनिवडणूक घेण्यात आली. बारामतीकर उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन मतरूपी दादांना श्रद्धांजली अर्पण करतील असे वाटले होते मात्र बारामतीकर अजितदादांना कसे विसरू शकतात? हे पोटनिवडणूकीत 58% झालेल्या मतदानावरून दिसत आहे.
सदरची पोटनिवडणूक बिनविरोध होईल वाटत होते मात्र, नियतीने त्याठिकाणी सुद्धा निवडणूक लावली आणि स्व.अजितदादा यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या विरोधात तब्बल 22 अर्ज दाखल झाले. यामध्ये काहींनी पाठिंबा दिला.
रेकॉर्ड ब्रेक मतदान करून सुनेत्रावहिनींना एक नंबरचे मतदान करू व करून घेऊ असा चंग राष्ट्रवादीच नव्हे तर महायुतीच्या सर्वच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बांधला होता. यामध्ये विरोधक सुद्धा मागे राहिले नाही. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सांगता सभेला आले. त्यांनी सुद्धा बारामतीकरांना आवाहन केले. ते एवढं सुद्धा म्हणाले की, मी जी आलो नसतो तरी तुम्ही वहिनींना भरघोस मताधिक्याने निवडून दिले असते. त्यांनी सुद्धा भरघोस मताधिक्याने निवडून देऊन अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी असे सांगितले.

एवढं सांगून, पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रचार करून सुद्धा मतदान करण्यास बारामतीकरांनी पाठ का फिरवली हेच अद्याप कळालेले नाही. बारामतीकर दादांना विसरू कसे शकतात हा खरा प्रश्न आहे. चार महिन्यात बारामतीकरांची अशी अवस्था असेल तर एक वर्षानंतर दादांसाठी आणखीन अश्रू वाहून काय फायदा असेही बोलले जात आहे.
बारामतीकरांना मत द्या, मतदान करा असे सांगण्यापेक्षा स्वतःहून बारामतीकरांनी मतदान केंद्रावर रांगा लावण्याची गरज होती. काही मतदारांनी अभिमानाने सांगितले की, कशाला प्रचार करता, आम्ही वहिनींनाच मतदान करणार आहोत असे खुलेआम सांगितले. तरी सुद्धा बारामतीकर मतरूपी श्रद्धांजली देण्यास मागे राहिले ही खूप खेदाची बाब आहे.
अजितदादांनी तुमच्यासाठी काय कमी केले असे म्हणण्याची वेळ बारामतीकरांवर आलेली आहे. कित्येक वेळा दादांनी पक्षातील कार्यकर्ता, पदाधिकारी व कुटुंबातील व्यक्ती सुद्धा याच बारामतीकरांसाठी नाराज केले ऐनवेळी त्यांच्यावर शिव्या शापांचा भडीमार केला. बारामतीकरांच्या चुका सुद्धा पदरात घेतल्या, मात्र, चुका सांगणाऱ्यांना खडेबोल सुनावले. एवढं प्रेम बारामतीकरांवर अजितदादा करीत होते. एखाद्या अधिकाऱ्याने बारामतीतील व्यक्तीचे काम करण्यास उशिर लावला किंवा पैश्याची मागणी केली तर त्या अधिकाऱ्याचे हक्क व अधिकार काय आहेत हे भर सभेत सांगत होते व चांगलीच कानउघडणी करीत होते. आज त्यांच्या जाण्याने बारामतीत पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी श्रीमती सुनेत्रावहिनींनी दुःखावर विर्जन टाकून याच बारामतीकरांसाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पती गेल्यावर दुःख काय असते हे एखाद्या स्त्रीला जावून विचारा म्हणजे दुःख काय असते हे कळेल. एवढं मोठे दुःखाचे संकट आलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अवलंबून असणाऱ्या आमदार, खासदारांचा विचार करता विशेषतः बारामतीच्या नागरिक मतदारांचा विचार करून त्यांनी तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अवलंबून असणाऱ्या कित्येकांना आधार दिला.
खरं तर पोटनिवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. तरी सुद्धा एवढं विरोधात अर्ज येत असतील तर पक्षावर नाराजी की, पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर नाराजी विरोधकांनी व्यक्त केली हे ही अद्याप गुलदस्त्यातच आहे. शेवटी लोकशाही आहे ज्याला त्याला आपला हक्क व अधिकार आहे. या सर्व प्रक्रीयेतून जाण्याची तयारी सुद्धा सुनेत्रावहिनींनी दाखविली होती.
ऊन, वारा व पाऊसाचा विचार न करता बारामतीकरांसाठी अजितदादांनी तन-मन व धनाने झपाटल्यासारखे बारामतीचा न भूतो, न भविष्यतो असा विकास केला. आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या रूपी सुनेत्रावहिनींना मत देण्यासाठी ऊनाचा विचार जर बारामतीकरांनी केला असेल तर हे ही खेदाची बाब आहे.
अजितदादा गेल्यानंतर बारामतीचे काय होईल असे सर्रास नागरिक बोलताना दिसत होते. जेव्हा सुनेत्रावहिनींनी दुःखाचा डोंगर बाजुला ठेवून पदभार स्वीकारला, भर सांगता सभेत मुख्यमंत्री यांनी नागरिकांना अजितदादांच्या स्वप्ना बाबत व ते स्वप्न पूर्ण करणेसाठी सुनेत्रावहिनींबरेबर आम्ही प्रयत्न करणार असे सांगताच बारामतीकरांचा जीव भांड्यात पडला. एवढं सांगून, ऐकूनही बारामतीकर मतदानास बाहेर पडला नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे.
कोणी काम केले, कोणी केले नाही ही बाब नगण्य आहे. भावनिक लाट असताना, एवढं मोठे विकास कामे अजितदादांनी करून ही त्याची थोडीसुद्धा किंमत बारामतीकरांना नसेल तर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. आज स्वर्गातून अजितदादा पहात असतील तर त्यांना सुद्धा प्रश्न पडेल हीच का ती बारामती व बारामतीचे नागरिक ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केले. त्यांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी काय नाही केले. असे म्हणत असतील.
बारामतीकरांनो बारामतीच्या आसपासच्या तालुक्यात नजर टाका तुम्हाला कळेल विकास म्हणजे काय? कोणीही असो कोणतेही कार्य करताना त्याचा थोडा तरी स्वार्थ असतो. परंतु, बारामतीचा नावलौकीक देशपातळीवर होत असेल तर बारामती स्वच्छ, सुंदर व हरित बनविण्यासाठी अजितदादांनी काय नाही केले. ज्याचा नाही त्याचा विरोध घेतला. वेळ पडल्यावर देवा-धर्माचा सुद्धा विरोध घेतला फक्त आणि फक्त बारामतीकरांसाठी व विकासासाठी तरीही माझ्यासह बारामतीकर दादांना विसरले. पुन्हा निवडणूका होतील मात्र, दादांना खरी मतरूपी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी संधी तुम्ही गमावली.