बारामती(प्रतिनिधी): पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गेल्या निवडणुकीत 70.35 टक्के मतदान झालेले असताना यावर्षी सरासरी 68 टक्के मतदान झाले. बारामतीत दु:खाचे वातावरण असल्याने मतदारांमध्ये निरुत्साह होता. त्यामुळे सुमारे 53 टक्केच मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले.
बारामतीत पहिल्या दोन तासांत अवघे 6.52 टक्के मतदान झाले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 6.52 टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत 18 टक्के, दुपारी दीडपर्यंत 30 टक्के आणि दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 41 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या दोन तासांमध्येही मतदार घराबाहेर न पडल्याने अवघे 53 टक्के मतदान झाले.
पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट आणि पंचायत समितीचे 146 गण आहेत. त्यासाठी 29 लाख 76 हजार 805 मतदार होते. शेवटच्या दोन तासांत मतदानाचे प्रमाण फारसे न वाढल्याने सरासरी 68 टक्के मतदान झाले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने या वेळेच्या निवडणुकीवर दुःखाचे सावट होते. बारामतीत गेल्या निवडणुकीत सुमारे 61 टक्के मतदान झाले होते. या वेळच्या निवडणुकीत मतदारांमध्ये निरुत्साह असल्याने अवघे सरासरी 53 टक्के मतदान झाले.
पुणे जिल्हा हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. 1999 वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू होता. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनाने या निवडणुकीवर दु:खाचे सावट आहे. खरी लढत ही अजित पवारांची ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप यांच्यामध्ये आहे.