बारामतीः कै.अजित पवार यांचे चुलत पुतणे व पक्षाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी अजित पवारांनी फोन कॉलवर शेवटचा संवाद केला होता. श्रीजीत पवार यांनी अजित पवारांना निवडणुकीसंदर्भात पाठवलेल्या एका मेसेजवर अजित पवारांनी थेट विमानातूनच त्यांना फोन करून त्यांच्या शंकेचं निरसन केलं होतं. यासंदर्भात श्रीजीत पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर ठेवलं आहे. यामध्ये अजित पवारांनी श्रीजीत पवार यांना नेमकं काय सांगितलं, हे त्यांनी जाहीर केलं आहे.
“आपण माळी समाजालाही जिल्हा परिषदेसाठी एक उमेदवारी देऊ असा विषय होता. बारामतीमध्ये आपण एनटी समाजाच्या व्यक्तीला जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली आहे. मार्केट यार्डला गावडेंना घेतलं आहे चेअरमन म्हणून. सातव नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे मी अजित पवारांना तसं विचारलं होतं. ते खरंतर माझं अज्ञान होतं की मला वाटलं आम्ही ओबीसींमधल्या माळी समाजाला उमेदवारी देऊ शकलेलो नाही. त्यामुळे मी मेसेज केला होता की दादा आपण माळी समाजाला एक संधी देऊ. त्यावर त्यांनी सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन जातोय असा संदेश दिला होता. ते जगाला कळावं, शेवटच्या श्वासापर्यंत तो माणूस सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करत होता हे कळावं म्हणून मी हे रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर आणलं. आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ हाच त्यांचा शेवटचा संदेश, शेवटचा आवाज होता”, असं श्रीजीत पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, फोनकॉल अर्धवट सुरू झाल्यासारखं वाटत असलं, तरी ते तसं नसल्याचं श्रीजीत पवार म्हणाले. “मी अजित दादांना मेसेज केला होता. तो मेसेज त्यांनी वाचला आणि माझा नंबर त्यांच्या ओळखीचा असल्यामुळे त्यांनी फोन करून हॅलो वगैरे न बोलता थेट मुद्द्याचं बोलायला सुरुवात केली. त्यामुळे फोन रेकॉर्डिंग इतकंच आहे”, असं ते म्हणाले.
28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून त्यांच्या विमानाने बारामतीच्या दिशेनं निघाले. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं. पण तिथे पोहोचल्यानंतर पहिल्या प्रयत्नात विमानाचं लँडिंग करण्यात वैमानिकाला अपयश आलं. विमानानं आकाशात एक फेरी घेऊन पुन्हा एकदा लँडिंगसाठी प्रयत्न केला. यावेळी विमान धावपट्टीपासून बाजूला जात मोकळ्या जागेत कोसळलं. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 4 जणांचा जागीच मृत्यू झाला.
