शोकाकुल वातावरणात अजितदादांवर अंत्यसंस्कार: दादा..दादा..हंबरडा फोडत केला आक्रोश

बारामती(प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामतीचे दादा ना.अजितदादा पवार यांचे विमान अपघाती निधन झाले हे बारामतीकर अजुनही मान्यच करेना अशी अवस्था बारामतीकरांची होऊन बसली आहे.

‌‘एकच वादा, अजितदादा,‌’ ‌‘अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे,‌’ ‌‘परत या, परत या, अजित दादा परत या‌’ असा हंबरडा फोडत हजारोंच्या साश्रू नयनांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

अजितदादांचे ज्येष्ठ सुपूत्र पार्थ पवार यांनी पार्थिवाला अग्नी दिला सोबत जय पवार होते. अचानक दादांसारखा उमदा नेता गमावल्याने बारामतीकरांना धक्का बसला आहे. हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्याचा अभिमान, बारामतीचा आत्मा अजितदादा.. अशा घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आल्या.

अडचणीतून मार्ग काढणारे दादा होते. दादांच्या शब्दाने अनेक अडथळे दूर होत होते. दिलेला शब्द पाळणारे दादा होते. बारामतीकर म्हणतात आता काम कोणाकडे घेऊन जायचे, आमचे छत्रच हरपले अशी प्रतिक्रीया यावेळी व्यक्त करण्यात आली.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी दादांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते, नागरिकांनी गर्दी केली हेती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नागरिकांची रीघ लागली होती. आज गुरूवारी सकाळी काटेवाडी येथे अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथेही अंत्यदर्शन घेण्यासाठी रीघ लागली हेती. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही कुटुंबियांसह काटेवाडीत अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. खा.शरदचंद्रजी पवार, सुनेत्रावहिनी पवार यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले.

याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!