बारामती(प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे पार्थिव आज सायंकाळी 4 वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल. गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल. सकाळी 11 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होईल.
ग्रामपातळीपासून ते राज्याच्या शासनस्तरावर जनतेच्या विकासासाठी अविरत काम करणारे अजितदादा होते. सार्वजनिक जीवनात सतत कार्यरत राहण्याची त्यांची ऊर्मी लक्ष वेधून घेणारी होती. सहकार, राजकारण, समाजकारणात त्यांचे मोठे योगदान राहिले. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय प्रभावी नेतृत्व हरपल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला आहे. राजकारणावर स्वच्छ प्रेम असणारा नेता म्हणून अजितदादांकडे पाहिले जात होते. प्रशासनावर अचूक पकड, स्पष्टवक्ते, जातीपातीला त्यांच्याकडे स्थान नव्हते, जमिनीशी घट्ट नाळ असलेले, दमदार व दिलदार नेता, कामाने आपल्या वागण्याने संपूर्ण राज्यात वेगळा दरारा निर्माण केला होता. शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जात होते.