बारामती(प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्ष बारामती शहर अध्यक्षपदी किरण किसनराव इंगळे यांची एकमताने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी पाठ थोपटत आज निवड केली.
किरण इंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांची आई कै.बायडाबाई इंगळे यांनी बारामती नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक पद भूषविले होते. मोठे बंधू शाम इंगळे हे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी बारामती नगरपरिषदेत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. इंगळे कुटुंब सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत आलेले आहेत. इंगळे कुटुंबावर बारामतीतील व्यापारी वर्गाचा गाढा विश्वास आहे. त्या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जावू दिला नाही. त्यामुळे इंगळे कुटुंबाची व्यापारी वर्गात वेगळी प्रतिमा आहे. पवार साहेबांच्या राजकारणापासून हे कुटुंब पवारांशी एकनिष्ठ आहेत. पवार कुटुंबाचा विश्वासही तेवढा इंगळे कुटुंबावर आहे.
किरण इंगळे यांना हुशार, अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे अध्यक्षपद असताना सामाजिक कार्य काय असते याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले होते.
अशा व्यक्तीमत्वाचे आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजित पवार यांनी कौतुक करीत शहराध्यक्ष पदाची जबाबदारी उद्यापासून सांभाळण्याचे आदेश दिले. निसंकोच किरण इंगळे या पदाला न्याय देतील यात तिळमात्र शंका नाही.
सदरचे पद किरण इंगळे यांना मिळणार म्हणून काही विघ्नसंतोषी लोकांनी ना.अजित पवार यांना किरण इंगळे यांची प्रतिमा मलिन होईल असे सांगितले असल्याचे कळते. त्यामुळे निवडीचे पत्र देऊनही किरण इंगळे यांची संपूर्ण चौकशी केल्यानंतर निवड पत्र देऊन काम करण्यास सांगावे असे ना.पवार यांनी सांगितले.
किरण इंगळे यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमून त्या समितीने चोख अहवाल दिला. यामध्ये किरण इंगळे हे स्वच्छ प्रतिमेचे कोणाचीही फसवणूक, अडवणूक व पिळवणूक न करणारे निघाले. काहींनी केलेल्या आरोपाचे एकप्रकारे खंडन झाले. यामधून पक्षातील कार्यकर्त्यांना एक गोष्ट कळाली कस्तुरी कितीही दडपली तरी ती दर्वळल्याशिवाय राहत नाही असे किरण इंगळे यांचे व्यक्तीमत्व यामाध्यमातून सर्वांसमोर आले.
किरण इंगळे यांचे कार्य म्हणजे सर्वसमावेश आहे. सर्वांनाबरोबर घेऊन काम करणारे ते आहेत. सध्या बारामती शहरात कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचे काम करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावे, चिंतन शिबीर, जिल्हा, प्रदेश पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबीर, प्रवासाच्या माध्यमातून कार्यकर्ता कसा जोडला जाईल याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. किरण इंगळे हे तळागळातून तावुन सुलाखून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. बारामती शहराचा विशेषतः गल्ली बोळाचा गाढा अभ्यास त्यांना आहे. या अभ्यासामुळे शहरातील कार्यकर्ते पक्षाशी भक्कम असे जोडले जातील यात शंका नाही. हे काम करण्यास किरण इंगळे कुठेही कमी पडणार नाही असे त्यांच्या कार्यातून दिसत आहे.
किरण इंगळे यांची निवड झाल्याचे शहरात कळताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चौका-चौकात फटाक्याची अतिषबाजी पहावयास मिळत आहे.