कृषिक प्रदर्शनात माजी मंत्री एकनाथ खडसे, कर्नाटकचे कृषी सहसंचालकांसह तेलंगणाने आयुक्त व्यंकट राम रेड्डी यांच्या भेटी: शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची माहिती घेतली

बारामती(प्रतिनिधी): ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व कर्नाटक राज्याचे कृषी सहसंचालकांसह तेलगणा राज्याचे माजी कृषी व रेशीम आयुक्त व्यंकट राम रेड्डी यांनी सर्व दालनास भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.

21 जानेवारी रोजी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. खानदेश भागामधील जळगाव, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यांमधून तसेच कर्नाटक, तेलंगणा येथील शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी मोठी गर्दी केली होती.

या पाहुण्यांचे स्वागत ट्रस्टचे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांनी केले. यावेळी श्री.खडसे यांनी प्रक्षेत्रावरील विविध दालनांना भेटी देत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. सोलर पॉलीहाउस, एआय आधारित कांदा, ऊस, द्राक्षे, डाळिंब प्रात्यक्षिके तसेच जनावरांचे प्रदर्शन या दालनांना त्यांनी भेटी दिल्या. कर्नाटक राज्याचे कृषी सहसंचालक, कृषी विज्ञान केंद्र (बेळगाव) येथील प्रमुख अधिकारी व शेतकरी यांनी देखील प्रदर्शनास भेट देत विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तसेच माजी कृषी व रेशीम आयुक्त, तेलंगणा राज्य श्री. व्यंकट राम रेड्डी यांनी देखील प्रदर्शनास भेट दिली.

प्रदर्शनातील बिना आवाजाचे इलेक्ट्रिक (ईव्ही) ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरले. आंतरमशागत, नांगरणी, रोटावेटर आदी कामांसाठी उपयुक्त असलेल्या 27 व 32 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची माहिती घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून आले. डिझेलची आवश्यकता नसल्याने हे ट्रॅक्टर एका चार्जिंगमध्ये सुमारे 4 तास कार्यक्षम राहतात. केवळ रु. 230/- इतक्या कमी खर्चात चार्जिंग होत असल्याने शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानाकडे विशेष ओढा दिसून आला.

22 जानेवारी रोजी प्रदर्शन पाहण्यास आलेले शेतकरी त्यांनी केलेल्या सूचना, आवडलेले विषय, अडचणी ट्रस्टचे चेअरमन राजेंद्रदादा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी स्वतः जाणून घेतल्या. विशेष करून एआयच्या ऊस व भाजीपाला प्लॉटला शेतकरी जास्त माहिती घेत होते. तसेच पशु प्रदर्शनामध्ये कोंबड्या, विविध जातीच्या गाई, म्हैस, शेळ्या इ. माहिती शेतकरी घेत होते.

बारामती येथून सायकल स्पर्धेचा मार्ग असल्याने प्रदर्शन ठिकाणी येण्याचे मार्ग दुपारी काही वेळ बंद असल्याने प्रदर्शन 1 तास उशीर पर्यंत चालू ठेवण्यात आले होते.

ज्ञानवर्धक, तंत्रज्ञानाधारित व अनुभवसमृद्ध ठरणारे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक, किफायतशीर व शाश्वत शेतीच्या दिशेने मार्गदर्शन करणारे ठरत आहे. सदर कृषी प्रदर्शन शनिवार, दि. 24 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात परभणी, अकोला, लातूर, बुलढाणा, सोलापूर, कोल्हापूर येथील जिल्ह्यांमधून येथील शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!