बारामती(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीचे आर्थिक सक्षमीकरण आणि कर संकलन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येते. या अभियांतर्गत पिंपळी ग्रामपंचायतीत घरपट्टी-पाणीपट्टी करवसुली करण्यात आली. ही करवसुली करण्यासाठी उपसरपंच अश्विनी बनसोडे यांचा पुढाकार महत्वाचा ठरला.
थकीत घरपट्टी, पाणीपट्टी धाराकांना 50 टक्के मागील करात सवलत तर चालू पूर्ण बाकी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे करवसुली होण्यास अडथळा होत नाही. राज्य शासनाने सर्वाधिक वसुली करून देणाऱ्या गावांना कोट्यावधी रुपयांची बक्षीसे देखील ठेवण्यात आली आहेत. वसूल होणाऱ्या करातून गावातील रस्ते, स्वच्छता,पथदिवे, ड्रेनेज अशी गाव व वाड्यावास्त्यावरील मूलभूत सार्वजनिक कामांसाठी निधीचा वापर करण्यात येणार आहे.
थकबाकीमुळे कित्येक ग्रामस्थ विविध योजनांपासून वंचित राहत होते व कर थकीत राहत होता. या बाबींमुळे ग्रामविकासाचा आर्थिक स्तर घसरला होता. यामध्ये सुधारणा व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या वतीने गाव पातळीवरती विशेष ग्रामसभा आयोजित करून गावात वाडया वस्त्यांवर जाहिरात फलक लावून व दौंडी देऊनही हवी तेवढी घरपट्टी, पाणीपट्टी वसुली होत नव्हती. याची चर्चा ग्रामपंचायत मासिक सभा व ग्रामसभेत झाली पन्नास टक्के मागील थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली व चालू पूर्ण बाकी भरून या सवलतीचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा म्हणून मा.उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अश्विनी सुनिल बनसोडे यांनी पुढाकार घेत विशेष ग्रामसभेत सरपंच स्वाती अशोकराव ढवाण व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांचेकडे आजे सासू कौशल्या भगवान बनसोडे यांचे नावावरील मागील थकीत व चालू वर्षाची पूर्ण बाकी स्वतः भरून आदर्शवत अशी सुरुवात करून दिली.
विशेष ग्रामसभा पासून 31 डिसेंबर पर्यंत या पन्नास टक्के सवलतीच्या संधीचा फायदा घेत अनेक नागरिकांनी कर भरणा केला. यातून लाखो रुपयांची थकीत वसुली या अभियानामार्फत झाली.
या अभियानासाठी मा.उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे यांचे बरोबरच गावच्या सरपंच स्वाती अशोकराव ढवाण, छत्रपती कारखाना मा.संचालक संतोषराव ढवाण, उपसरपंच अजित थोरात, मा.सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, सदस्या मीनाक्षी अशोकराव देवकाते,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशासेविका यांनी विशेष परिश्रम घेऊन जनजागृती करून गावातील ग्रामस्थ महिला व बचत गटातील महिलांना देखील या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबविला. नुकताच ग्रामविकास मंत्रालयामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका,जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा कालावधी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली असल्याचा शासन निर्णय पारित केला आला आहे. परंतु पन्नास टक्के कर सवलती बाबत निर्देश निश्चित करण्यात आलेले नाहीत.