नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये मराठा समाज व व्यापाऱ्यांमध्ये चुरस

बारामती(प्रतिनिधी): बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज जमा करून घेतले आहेत. गुरूवार दि.13 नोव्हेंबर रोजी स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. या मुलाखतीतून योग्य उमेदवार बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरविणार आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी एकुण 17 अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये मराठा समाज आणि व्यापाऱ्यांमध्ये पदासाठी चुरस लागलेली दिसून येत आहे. मागील नगराध्यक्षपदाचा आढावा घेतला असता. व्यापारी वर्गातून सौ.भारती मुथा, सौ.मंगला सराफ व सुभाष सोमाणी यांना नगराध्यक्ष पदावर संधी देण्यात आलेली होती.

आताच्या निवडणूकीत इच्छुकांमध्ये सुभाष सोमाणी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे. यापुर्वी त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिलेली होती तरी ते एका प्रभागातून निवडून येऊ शकले नसल्यामुळे आता त्यांना अजितदादा संधी देतील का नाही याची शाश्वती नाही.

मराठा समाजाचा विचार केला असता. सचिन सातव आणि जयसिंग उर्फ बबलू देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाचा दावा केलेला आहे. गेली दहा ते बारा वर्ष झाली मराठा समाजाला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे प्रतिनिधीत्व करण्यास संधी मिळाली नाही.
मागील पंचवार्षिक ओबीसी पुरूष आरक्षण होते. त्याठिकाणी ओबीसी महिला सौ.पौर्णिमा तावरे यांना संधी देण्यात आली होती. माळेगाव नगरपंचायती नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्ग असल्याने बारामतीतील नगराध्यक्षपद मराठा समाजाला मिळाले पाहिजे अशीही मागणी मराठा समाजातून होताना दिसत आहे.

सचिन सातव यांना नगरपरिषदेचा कामकाजाचा अनुभव आहे. अजित पवार यांना अपेक्षित विकास कामे मार्गी लावणारे सचिन सातव आहेत. प्रशासन हाताळण्याची कसब व सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. ते उच्चशिक्षीत बी.ई.मॅकॅनिकल शिक्षण घेतलेले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान असणारे व स्वतः तंत्रज्ञान हाताळून बारकावे पाहण्याची कला त्यांच्याकडे आहे. सामाजिक प्रश्नाची जाण व भान जपणारे आहेत. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे आहेत. प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी त्यांच्यावर बारामती बँकेची चेअरमनपदाची जबाबदारी दिल्यानंतर बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे काम दादांच्या आशीवार्दामुळे ते करू शकले.

हे काम करीत असताना सर्व थकबाकीदारांचा विरोध विशेषतः कुटुंब, पै-पाहुणे व नातेवाईकांचा विरोध पत्करला. आज बँकेचा शून्य टक्के एनपीए झालेला आहे. या बँकेवर अवलंबुन असणारे कर्मचारी वर्ग व ठेवीदार आता बँकेवर विश्वास ठेवत आहे. इतर बुडीत बँकेप्रमाणे या बँकेची अवस्था झाली असती आणि त्यामुळे बँकेवर अवलंबून असणाऱ्या कर्मचारी यांची उपासमारीची वेळ आली असती.

सचिन सातव यांच्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा फायदा बारामती नगरपरिषद व सर्वसामान्य नागरिकांना व्हावा यासाठी नगराध्यक्षपदी सचिन सातव यांना संधी मिळावी अशी तमाम नागरिकांतून बोलले जात आहे.

लोकं म्हणतात, काही कुटुंब पवारांना अंधारात ठेवून डबल गेम करीत आहेत. मात्र तसे नाही काळाने पवार कुटुंबात दुफळी निर्माण झाली. काका-पुतणे वेगळे झाले. संपूर्ण महाराष्ट्रात पवार कुटुंबाबाबत चर्चेचा विषय बनला होता. या दुफळीमुळे कित्येक कुटुंबात सुद्धा दुफळी निर्माण झाली. मुलगा एकीकडे तर वडील, काका एकीकडे अशी अवस्था संपूर्ण राज्यात पहावयास मिळाली. पवार साहेबांच्या राजकारणा पासून जे कुटुंब पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ते आजही पवार कुटुंबाच्या हृदयात आहेत व राहतील यात तिळमात्र शंका नाही.

पवार कुटुंबियात राजकीय मतभेद झाले आहेत. कौटुंबिक मतभेद व मनभेद झालेले नाही याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना मानणाऱ्या कुटुंबाचे सुद्धा झालेले आहे. ज्याने त्याने आपआपली त्या व्यक्तीवर असणारे प्रेम, निष्ठा ठेवून काम एकनिष्ठेने केले. तरी काहींच्या मनात शंका येत असेल तर त्याचे तोंड दाबता येणार नाही.

सदरचे नगराध्यक्ष पद हे पाच वर्षासाठी आहे. ना.अजित पवार यांच्या विकासात्मक दृष्टीचा नगराध्यक्ष असल्यास, विकासाची गंगा तळागळापर्यंत पोहचविण्यास मदत होईल असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!