नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? सचिन सातव, जयसिंग देशमुख, जय पाटील, सुभाष सोमाणी रिंगणात तर कोणाचे पारडे जड!

बारामती(प्रतिनिधी): नगराध्यक्ष पदासाठी सुरू असलेली राजकीय चुरस आता शिगेला पोहोचली आहे. शहरात आणि पक्षांतर्गत स्तरावर चर्चा रंगल्या असून, “नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?” हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

पक्षातील वरिष्ठ नेत्यांदरम्यान गुप्त बैठकांचे सत्र सुरू आहे. काही गट अनुभवी नेतृत्वावर भर देत आहेत, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी करत आहेत. पक्षातील अंतर्गत समीकरणे, सामाजिक संतुलन, आणि मागील निवडणुकीतील कार्यकर्त्यांचे योगदान या सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बारामती बँकेचे अध्यक्ष, नगरपरिषदेचे माजी गटनेते सचिन सातव, माजी नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू देशमुख, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष जय पाटील व माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी हे रिंगणात उतरलेले आहेत. यामध्ये कोणाचे पारडे जड हे येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे.

शहरातील काही प्रभावी नगरसेवकांनी या पदासाठी आपली दावेदारी सादर केली असून, प्रत्येक जण आपापल्या गटात पाठबळ मजबूत करण्यासाठी सक्रिय आहे. पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतरच अंतिम नाव जाहीर होणार आहे.

शहरातील नागरिकांमध्येही या निवडीबाबत चर्चा रंगली आहे. “शहराच्या विकासासाठी कोण योग्य?” न भूतो न भविष्यतो झालेला विकास टिकविण्यामध्ये व त्यामध्ये सतत भर पाडणारा द्यावा, चाळीस नगरसेवकांची योग्य सांगड घालणारा द्यावा, नगरपरिषदेचे ज्ञान असणारा व प्रशासन हाताळणारा द्यावा, स्वतः कामे हाताळणारा द्यावा अन्यथा दोन-दोन पीए ठेवून नागरिकांना त्यांच्याकडे पाठविणारा नसावा. सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून काम करणारा असावा. ‌‘स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार द्यावा अशा भावना व्यक्त होत आहेत.

सचिन सातव :-
सचिन सातव यांनी बारामती बँकेच्या अध्यक्षपदाचा पद्भार स्विकारला तेव्हा बँकेचा एनपीए पाहुन बँक रसातळाला जाईल अशी आर्थिक परिस्थिती होती मात्र, आर्थिक अडचणीतून बाहेर काढून शून्य टक्के एनपीए केला. बँक व बँकेवर अवलंबून असणाऱ्या कित्येकांचा प्रपंच वाचविण्यासाठी त्यांनी स्वकीयांचा रोष पत्करला आणि बँक आर्थिक अडचणीतून बाहेर काढली. ना.अजित पवार यांना दिलेला शब्द पाळला. बारामती नगरपरिषदेचे गट नेते पदाची योग्य भूमिका बजावली. नगरपरिषदेत निवडून आलेल्या नगरसेवकांची भूमिका एकच असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला. या काळात पक्षाचे व पक्ष हिताचे निर्णय त्यांनी घेतले. गटनेता पदाला अनन्य साधारण महत्व असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही सदस्याला नाहक त्रास न देता त्याची कोंडी न करता किंवा टोकाची भूमिका न घेता सर्वांना सांभाळून घेतले. वेळोवेळी पक्षाचे धोरण सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. बारामतीत रक्ताचा पुरवठा कमी पडल्यास त्यांचा मित्र मंडळ व महालक्ष्मी उद्योग समुहातील अधिकारी व कर्मचारी रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी धावून गेलेली आहेत. गरजु होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी प्रयत्न केला आहे. बँकेच्या माध्यमातून जातीपातीचा विचार न करता आर्थिक दुबळ घटकातील युवकांना उद्योगधंदा सुरू करण्यासाठी त्यांना बँकेतर्फे आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या अंगी सहनशिलता ठासून भरलेली आहे. आरोप-प्रत्यारोपाला ते संयमाने उत्तर देत आलेले आहेत. बँकेतील साडे तीनशे अधिकारी व कर्मचारी हाताळण्याची व त्यांचेकडून काम करून घेण्याची कसब त्यांच्याकडे आहे. बारामती नगरपरिषदेत दोनशे पन्नास कर्मचारी आहेत तेही नगरपरिषद एकच आहे. त्यामुळे प्रशासन हाताळण्याचा अनुभव त्यांना पहिला होताच त्यामुळे नगराध्यक्षपदाची भूमिका ते निसंकोच सांभाळतील.

सचिन सातव यांचे आजोबा कारभारीआण्णा, वडिल सदाशिवबापू सातव, आई जयश्रीभाभी सातव यांनी बारामती नगरपरिषदेचे चोख कामगिरी बजावली आहे. त्यामुळे सचिन सातव यांना कुटुंबातूनच बाळकडू मिळाले आहे. त्यामुळे तेही कुटुंबाचे नावात आणखीन भर टाकतील याच शंका नाही.

जयसिंग उर्फ बबलू देशमुख:-
बबलू देशमुख हे माजी नगरसेवक आहेत. कै.अशोककाका देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अशोक काकांनी सुद्धा नगरपरिषदेत प्रभावात्मक काम केले. बारामतीच्या नगरीत कुठेही काकांना उभे केले तरी ते निवडून येण्याची त्यांची वेगळी शैली होती. बबलू देशमुख पूर्वी कै.धनंजय देशमुख यांनी काकांच्या कामाचे अनुकरण करीत नगरपरिषदेत उडी घेतली होती. सामाजिक कार्यात एक पाऊल पुढे असणारे देशमुख कुटुंब आहे. बारामती शहरात प्रभाव पडणारे कुटुंब आहे. काका व धनुभाऊ यांचा आशिर्वाद पाठीशी घेऊन बबलू समाजात काम करीत आहेत. कमी बोलून जास्तीचे काम ते करीत आलेले आहेत. युवकांची अतुट अशी फळी त्यांनी निर्माण केलेली आहे. प्रत्येक समाजाच्या जयंती,उत्सव व सार्वजनिक मंडळांना सढळ हाताने मदत करीत आलेले आहेत. काका व धनुभाऊ यांनी न होणारी कामे मार्गी लावलेली आहेत हा इतिहास आजही साक्ष देतो.

जय पाटील:-
कोणताही राजकीय वरदहस्त नसताना, शून्यातून विश्व निर्माण करणारे जय पाटील आहेत. तांदुळवाडी गावात सामाजिक कार्यातून कामाची सुरूवात जय पाटील यांनी केली. तांदुळवाडी गावासाठी व ग्रामस्थांसाठी काही तरी केले पाहिजे ही धडपड त्यांची होती. सामाजिक कार्याचा वेलू त्यांचा गगनभरारी घेतो हे सांगण्याची गरज नाही. गावातील लोकांना देवदर्शनासाठी पाठविण्याचे सामाजिक कार्य त्यांनी सुरू केले. तद्नंतर तांदुळवाडी गावच्या वेशीत मोठ-मोठ्या कंपन्या आहेत या कंपन्यांचा सीएसआर फंड गावच्या विकासासाठी मिळावा हा उद्देश ठेवून त्यांनी प्रथमतः कल्याणी इंडस्ट्रीज कंपनीला पहिला पत्रव्यवहार केला. त्यामाध्यमातून त्यांनी गावचा विकासाचा दूरदृष्टीकोन ठेवला. गावचे सरपंच झाले, स्पष्ट निस्वार्थी वृत्तीमुळे त्यांना काही मंडळींनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्याच न जुमानता ते गावाच्या हितासाठी काम करीतच राहिले आणि यशस्वी झाले. नगरपरिषदेत तांदुळवाडी गाव आलेनंतर नगरसेवक पदाचा मान सुद्धा त्यांनी मिळविला. त्यानंतर उपनगराध्यक्ष पद ही भूषविले. सध्या त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती शहर अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी ते चोख व सक्षमपणे सांभाळीत आहेत. नगराध्यक्षपद जरी सर्वसाधारण प्रवर्गातून असले तरी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार हे सर्वसाधारण प्रवर्गातून ओबीसी वर्गातून उमेदवारही देऊ शकतात त्यामुळे त्यांनी या पदासाठी दावा केला आहे.

सुभाष सोमाणी:-
सुभाष सोमाणी हे एक कुशल व्यापारी आहेत. ना.अजित पवार यांचे निकटवर्ती सुद्धा समजले जातात. यापुर्वी त्यांनी नगराध्यक्षपदाची भूमिका बजावली आहे. अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यावर त्यांनी सामाजिक कार्याचा झपाटा लावला. मंडळाच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सांस्कृतिक कार्यक्रमातून बारामती शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली. स्वच्छता उपक्रम, वृक्षारोपण इ. सारखी कामे केली. मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून काम केले. संघटन कौशल्य, समाजिक भान जपत कार्य केले व करीत आहेत.

यांच्या व्यतिरीक्त आणखी काहींनी नगराध्यक्षपदासाठी दावा केलेला आहे. शेवटी नगरपरिषदेच्या कामात जातीने लक्ष देणारा, नेत्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून कार्य करणारा, विश्वासू पक्षाशी एकनिष्ठता असणारा नगराध्यक्ष नेते लवकरच करतील याच शंका नाही.

काही सूत्रांच्या माहितीनुसार, नगरपरिषदेत गटबाजी करणाऱ्यांमुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होताना दिसत आहे. काही कार्यकर्ते बाहेरून उमेदवार ‌‘आयात‌’ करण्याच्या प्रयत्नांवर नाराजी व्यक्त करत आहेत.

पक्ष नेतृत्वाने काही दिवसांत अंतिम घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. त्या घोषणेनंतर शहराच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!