सोनार समाजाला नगरपरिषदेत प्रतिनिधीत्व मिळावे, सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल असा इतिहास बारामतीत घडेल: सोनार समाजाची मागणी

बारामती(प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सोनार समाजाचे महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव, शाहु,फुले व आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. पक्षाने आतापर्यंत प्रत्येक समाज घटकाचा विचार करून विकास कामे केलेली आहेत व प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिलेली आहे. बारामती नगरपरिषदेच्या इतिहासात आतापर्यंत कधीच सोनार समाजाला नगरसेवक पदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे 2025 च्या पंचवार्षिक निवडणूकीत सोनार समाजाला नगरपरिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सोनार समाजाने केली आहे.

सदरचे निवेदन बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते सचिन सातव यांना सराफ सुवर्णंकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश बुऱ्हाडे यांनी दिले आहे.

या निवेदनात समितीतर्फे नगरसेवकपदासाठी एक मताने जोजारे सराफाचे मालक गणेश जोजारे यांच्या नावाला संमती दिलेली आहे. जोजारे यांनी समाजाचं आपण काही तरी देणं लागतो या उद्देशाने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात काम केले आहे. विविध जाती-धर्मातील लोकांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सर्व समाजाला घेऊन ते विविध विधायक उपक्रम राबवित असतात. अशा सामाजिक कार्याची तळमळ असणाऱ्या सोनार समाजातील व्यक्तीला नगरसेवक पदाची संधी उपलब्ध करून दिल्यास, सुवर्णकार समाजात सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल असा इतिहास बारामतीत पहिल्यांदा घडेल.

पवार साहेबांच्या राजकारणापासून ते राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व खा.सुप्रिया सुळे, खा.सुनेत्रा पवार यांच्या खंबीरपणे पाठीशी सोनार समाज कायम उभा राहिलेला आहे. शहरात समाजाचे 3 ते 4 हजार मतदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांना सामावून घेऊन काम करीत आलेले आहे. त्यामुळे या समाजाचा विचार सुद्धा ना.अजित पवार करतील अशी आशा समाजाने व्यक्त केली आहे.

नगरपरिषदेत नगरसेवक पदापासून समाज वंचित आहे. या समाजाला संधी मिळाल्यास त्याचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही. ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय नेते ना.अजित पवार यांनी पूर्ण करावी असेही उमेश बुऱ्हाडे यांनी सचिन सातव यांचेकडे व्यक्त केली आहे.

सोनार समाजाने केलेल्या मागणी ना.अजित पवार यांच्यासमोर ठेवून पाठपुरावा करण्याचा मनोमन प्रयत्न करेन असे सचिन सातव यांनी यावेळी आश्वासन दिले.

सदर निवेदन देते समयी समितीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोकुळ लोळगे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख उमेश बागडे, सोनार समाजाचे अध्यक्ष रघुनाथ बागडे, सराफ असोसिएशनचे सेक्रेटरी अंगदराव होनमाने, मिठू कुलथे, महेंद्र शहाणे इ. समाजा बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!