बारामतीः शहरात सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याबद्दल नकारात्मक बोलून त्यांना सतत पाण्यात पाहणे आणि माझ्याशिवाय नगरपरिषदेचे पान ही हालत नाही असे बोलून पक्षाचे एकनिष्ठेने काम करणाऱ्यांचे खच्चीकरण करणाऱ्यामुळे बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक प्रकारे लागलेली वाळवी आहे.
लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामपंचायत निवडणूका लागल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत असे. कसबा व भिगवण चौक याठिकाणी सुसज्ज पक्षाचे कार्यालय असताना सुद्धा येथे कोण आहे की नाही असे म्हणावे लागत होते. जेव्हापासून बारामती शहर अध्यक्षपदाची धुरा माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी हाती घेतली तेव्हापासून शहरात आलेली मरगळ दूर झालेली आहे. पक्षातील कार्यकर्ते सज्ज व सतर्क झालेले दिसत आहेत. भिगवण चौकातील पक्ष कार्यालयाचे केलेले नूतनीकरण पाहता पक्षाचे विचार, कामाची पद्धत याचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. तसेच बारामती तालुका नवनिर्वाचित अध्यक्षपदी माजी पंचायत समिती सभापती संदीप बांदल यांची निवड केली आहे. ते सुद्धा पक्षाला एक सक्षम नेतृत्व लाभलेले आहे. येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांचे खंबीर नेतृत्व सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही.
नगरपरिषदेच्या निवडणूकीत प्रथमतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहरातील कार्यालयात झालेली तोबा गर्दी पाहुन कार्यसक्षम नेतृत्व असणाऱ्या शहराध्यक्ष जय पाटील यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. हे पक्षाचे पदाधिकारी करीत असलेल्या कार्याला खिळ घालण्याचे काम काही मंडळी करीत असतात. यामुळे पक्षाचे काम होत नाही किंवा पक्षाकडे कार्यकर्ते आकर्षिले जात नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली जाणवते.
पक्षाच्या स्थानिक संघटनेला बळकट करण्याचे काम शहराध्यक्ष करीत असतो. जय पाटील यांनी पक्ष व्यक्तीला नव्हे तर विचारधारेला महत्व देतो हे बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे. या भूमिकेमुळे कित्येक कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून सकारात्मक पक्षाचे काम करण्यास सुरूवात केलेली आहे. शहरातील ज्या संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड आहे तेथील मुख्य पद शहराध्यक्ष पदापेक्षा मोठे नाही हेही मान्य केले पाहिजे.
आतापर्यंत शहराध्यक्षांना ताटाखालचे मांजर असल्यासारखी वागणूक कोणी दिली. त्यांची किंमत कोणी कमी केली. त्याला काय येते तोच मला विचारतो असे म्हणून स्वतःची टेरी कोण बडवीत होते. पक्षाचे नेते ना.अजित पवार यांच्यासमोर मी तुला कसं अडचणीत आणले हे दाखवून त्यास वेठीस धरण्याचे काम कोणी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका व शहर कार्यकारिणीची किंमत कोणी कमी केली. एकमेकांमध्ये भांडणे लावून स्वतःचा स्वार्थ कशापद्धतीने साधला. शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकून सर्वात जास्त मलिदा कोणी लाटला. या सर्व बाबींचा विचार केला असता, शहरात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेली वाळवी दूर करण्याचे काम जय पाटील यांच्या रामबाण उपायांमुळे झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये.