बारामती(प्रतिनिधी): बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे काही इच्छुकांनी मागणी केली आहे. नगराध्यक्ष कुबड्यावर चालणारा नको, स्वबळावर भार सोसणारा हवा याचा विचार करून तरी इच्छुकांनी मागणी केली पाहिजे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार बारामतीत दिसत आहे. उतवळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी काहींची घाई दिसत आहे. जसं काय पक्षाचे नेते माझ्याशिवाय कोणालाच नगराध्यक्षपद देणार नाही. सध्या एकाच नावाची चर्चा आहे ते लवकरच पक्षाचे नेते जाहीर करणार आहेत. काहींना स्वतःच्या व्यवसायातून डोकं वर काढता येत नाही अशांनी नेत्यांना भेटून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
पक्षाचे नेते दिवस उजडायच्या आत विकास कामांची पाहणी करण्यास फिल्डवर असतात. ज्या इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी मागणी केली आहे त्यांनी कधी तांबडं फुटण्याची वेळ सुद्धा पाहिली नसेल. म्हणे मला नगराध्यक्ष करा. ज्या कोणी इच्छुकांनी नगराध्यक्ष पदासाठी मागणी केली असेल, त्यांनी प्रथमतः आरश्यात तोंड पाहण्याची गरज आहे. आपण खरंच नगरीची सेवा करण्यास, आरोप-प्रत्यारोपास तोंड देण्यास प्रबळ, खंबीर आहोत का? नगराध्यक्षपदाचा भार सांभाळताना आपण कुबड्यांचा आधार तर घेणार नाही ना? या कुबड्या पाच वर्षे साथ देतील का? ऐनवेळी या कुबड्या काढून घेतल्यास काय अवस्था होईल, याचाही सद्सद् विवेक बुद्धीने विचार करण्याची गरज आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ज्या इच्छुकांनी मागणी केली आहे. त्यांना पाहुन किंवा त्यांचा एकांतात नाव घेऊन विचार केला तरी हसणे थांबणार नाही. मागणी करण्याचा सर्वांना अधिकार आहे ती केलीच पाहिजे. नगराध्यक्ष पद म्हणजे जत्रेतील खेळणं नव्हे चालले, चालले नाही तर मोडून टाकले.