ड्रग्ज प्रकरणी चार व्यक्तींना चौकशीसाठी न बोलवता, त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज -खा.सुप्रिया सुळे

पुणे: केवळ चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून काही होणार नाही, तर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला हवं असं बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा परिषद येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

सध्या देशात अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज ऍँगलवरुन बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबीकडून चौकशा सुरु आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर संवाद साधला.

सौ.सुळे पुढे म्हणाल्या की, मी महाविद्यालयीन जीवनापासून तंबाखू विरोधात काम करीत आहे. त्यामुळे अशा गोष्टी समाजात असूच नये, असे माझे स्पष्ट मत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आपण तंबाखू मुक्त अभियान राबवित आहोत. तसे केंद्र सरकारने ड्रग्समुक्त अभियान राबविण्याची आवश्यकता आहे.

शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात अशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. या गोष्टी झाल्यास तरुण वर्ग ड्रग्ज सारख्या गोष्टींपासून दूर राहील. सध्या ड्रग्जप्रकरणी हाय प्रोफाईल तीन महिलांना चौकशीसाठी बोलावून, यामधून काहीही साध्य होणार नाही. याला मुळापासून उखडणे गरजेचे आहे, अशी भूमिकाही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!