मुंबई : ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी काही नेते करत आहेत. या मागणीमुळे मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात वाद निर्माण केला जात असल्याचे माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे.
श्री.शेंडगे बोलताना म्हणाले की, जे मराठा समाजाला दिलं जात आहे, तसे लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केले जाणार आहे. यावेळी ओबीसी समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. पुढच्या टप्पातील आंदोलन हे तहसीलदार कार्यालय समोर केले जाईल, ज्याची तारीखनंतर जाहीर केली जाईल असेही शेंडगेंनी सांगितले.
त्यांनी आवर्जुन सांगितले की, आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत. राज्यात सद्यस्थितीत सुरु असलेली मेगाभरती थांबवली पाहिजे. ओबीसीला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमी केली आहे, असेही प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले.
दरम्यान सर्वांचे आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण देण्याची मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उद्विग्न भावनेतून केली असावी, असे मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले होतं. राज्यातील मागासवर्गीय समाज व बारा बलुतेदारांचा जीवनासाठी संघर्ष अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करुन चालणार नाही, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले होते.