कणकवली सारखी धाड बारामतीत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार कधी टाकणार: मटका, जुगार, अवैध दारू धंद्यांना कोणाचा पाठींबा?

बारामतीः सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी कणकवली येथे अवैधरीत्या सुरू असलेल्या मटका अड्यावर स्वतः धाड टाकून पोलीसांनाच आरोपीच्या घेऱ्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची तर प्रशासनावर मजबुत पकड आहे. प्रशासन कसे हाताळायचे याचा कित्येक वर्षाचा अनुभव त्यांना आहे. तरी सुद्धा पोलीस प्रशासन बारामतीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कोणतीही ठोस कारवाई करीत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे. ना.अजित पवार यांनी थेट अशी धाड टाकून पोलीसांचा कारभार कसा आहे हे जनतेला दाखवून द्यावे.

बारामती शहर व तालुक्यात प्रत्येक गाव व वाडी वस्त्यांवर मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गांजा विक्री, गुटखा विक्री, अवैध प्रवासी सर्रासपणे सुरू आहे. एखाद्या पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली असता तेवढ्यापुरती कारवाई केली जाते. तद्नंतर जैसे-थे व्यवसाय सुरू राहतो तो ही तेजीत याचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.

बारामती शहरात गल्ली बोळातून मटका, जुगार, अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू असताना सुद्धा पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. एखाद्या पत्रकाराने बातमी प्रसिद्ध केल्यास त्या अवैध व्यवसाय करणाऱ्याला त्या पत्रकाराकडे लावून त्याचे भागव असे सांगितले जाते. ठोस कारवाई केली जात नाही.

बारामती शहर व तालुक्यात अवैध धंदे करणाऱ्यांची यादी पाहिली असता, जे सुरूवातीला धंदे करीत होते तेच पुन्हा अवैध धंदे करीत आहेत. म्हणजे या लोकांवर कारवाई करूनही पुन्हा हीच लोकं अवैध धंदे जोमाने चालवितात म्हणजे पोलीसांचा दबाव, धाक यांच्यावर राहिलेला नाही. अवैध धंद्यांबाबत कित्येकांनी आंदोलन, उपोषण केले. अर्ज, तक्रारी केले तरी सुद्धा हे अवैध धंदे बंद होत नसतील तर नागरिकांनी याचा काय बोध घ्यायचा.

काही अवैध धंदे करणारे जशी सत्ता असेल तसे पक्ष बदलत असतात, पक्षाच्या नावाखाली अवैध धंदे सुरू ठेवण्याचा एक प्रकारे धंदाच आहे. त्यामुळे अशा लोकांवर ना.पवार यांनी करडी नजर ठेवावी.

त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट एखाद्या मटका, जुगार अड्डयावर धाड टाकावी म्हणजे पोलीसांचा सुरू असलेला कारभार समोर येईल अशी नागरिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!