भिगवण(प्रतिनिधी-योगेश गायकवाड):भिगवण पोलीस स्टेशनच्या निर्भय पथकातर्फे समाजातील तरुण मुलामुलींमध्ये सुरक्षितता व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सतत विविध उपक्रम राबवले जातात. याच माध्यमातून नुकतेच न्यू इंग्लिश स्कूल, डाळज नं. 2 येथे इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
या सत्रात दीपा मोरे, सुप्रिया बनसोडे व वैष्णवी राऊत या महिला पोलीस हवालदार यांनी विद्यार्थ्यांना निर्भय पथकाची कार्यपद्धती समजावून सांगितली. त्यांनी शालेय परिसरात व बाहेरील ठिकाणी सुरक्षित कसे राहावे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी, मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा, तसेच मोबाईल आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, भविष्यात कोणत्याही अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाल्याचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.