बारामती: १५ ऑगस्ट २०२५ – स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने बारामतीत ज्ञान आणि जागरूकतेचा संगम अनुभवायला मिळाला. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीत “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने झाली आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे, पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी यांच्या उपस्थितीत माहितीपूर्ण सत्र घेण्यात आले. या सत्रात स्पॅम कॉल्स, OTP घोटाळे, आर्थिक फसवणूक, पीएम किसान योजनेशी संबंधित स्कॅम्स आणि विविध डिजिटल गुन्ह्यांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, समितीतील काही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भोगलेल्या सायबर फसवणुकीचे अनुभवही शेअर झाले व त्यांना मदत केली जाईल अशी शाश्वती दिली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले क्विक हील फाउंडेशनने नव्याने सुरू केलेले “AntiFraud AI” मोबाईल अॅप्लिकेशन. मोबाईलसाठी अँटीव्हायरसप्रमाणे कार्य करणारे हे अॅप डिजिटल फसवणूक, फसवे कॉल्स, बनावट लिंक्स व ऑनलाइन स्कॅम्सपासून संरक्षण करते. विद्यार्थ्यांच्या व स्वयंसेवकांच्या मदतीने उपस्थित सर्वांनीच आपल्या मोबाईलवर हे अॅप इन्स्टॉल केले. तज्ज्ञांनी या अॅपचे फायदे समजावून सांगताना “डिजिटल जगात हे अॅप नागरिकांचे सायबर कवच ठरेल” असे सांगितले.
शेवटी सर्वांनी एकमुखाने सायबर सुरक्षिततेसाठी जागरूक राहण्याचा संकल्प केला आणि “सायबर शिक्षणातूनच खरी सायबर सुरक्षा” हा संदेश दिला.
उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांमध्ये क्लबचे अध्यक्ष अभय साहु, सचिव संदिप माने, गतिविधी संचालक ज्योती गुरव, मिडिया संचालक सायली ढगे, आणि सायबर वॉरियर्स निकीता पोमणे, दिशा जाडकर, बाळकृष्ण शिंदे यांचा समावेश होता.
या उपक्रमाबद्दल विशेष आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे, तसेच समस्त पदाधिकारी व सभासद मंडळींनी व्यक्त केले.