बारामतीः बारामती नगरपरिषदचे मुख्याधिकारी पंकज भुसे व पोलीस निरीक्षकांनी पथविक्रेते (हॉकर) यांच्यावर बेकायदेशीर कार्यवाही केल्याने बारामती शहरात हॉकर व सामाजिक कार्यकर्त्यांकडून बंदची हाक देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
मोर्चास सुरूवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून इंदापूर चौक, गुणवडी चौक, महावीर पथ, गांधी चौकातून भिगवण चौकात निषेध सभा घेण्यात आली. मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करत, मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा ठपका ठेवला. त्यांनी पथविक्रेते संरक्षण व पथविक्रेते विनियमन अधिनियम 2014 चा भंग केल्याचा आरोप करत, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

बारामती नगर परिषद पथविक्रेते समितीच्या सदस्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, पथविक्रेते समितीच्या संमतीशिवाय व सर्वेक्षणाअभावी कोणत्याही विक्रेत्यांवर कारवाई करणे गैरकायदेशीर आहे. तसेच, अनेक विक्रेत्यांचे नुकसान झाल्याचे नमूद करत त्यांची नुकसानीची भरपाई देण्याची ही मागणी करण्यात आली.
या निवेदनात मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तक्रार निवारण व वाद निर्णय समिती तात्काळ गठीत करावी. सर्व पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून हॉकर झोन तयार करून त्यांना प्रमाणपत्र द्यावे. बारामती नगरपरिषद पथविक्रेते समितीमधील सर्व सदस्यांची ओळख पत्र द्यावे. जोपर्यंत सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत कोणत्याही पथविक्रेत्यावर कारवाई करू नये. अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर बारामती नगरपरिषद पथविक्रेते समिती सदस्य व एआयएमआयएम पुणे जिल्हाध्यक्ष फैजाज इलाही शेख, राहुल कांबळे, आसिफ शेख, सुधीर घोडके, शुभम अहिवळे यांसह वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे व बहुजन समाज पार्टीचे काळुराम चौधरी, विजय जगताप, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज कुमार, राष्ट्रवादी(शरद पवार गट) महिला अध्यक्ष आरती गव्हाळे, वंचित महिला तालुका अध्यक्ष सुरेखा लोंढे, अजिज सय्यद, ॲड. अक्षय गायकवाड, आरपीआयचे रविंद्र सोनवणे यांच्या सह्या आहेत.
बारामतीमध्ये हॉकर विरोधात कारवाई थांबवून, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, त्याचबरोबर मग्रूर मुख्याधिकारी पंकज भुसे यांची त्वरित हकलपट्टी करावी अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.