बारामतीः येथील बारामती वकील संघटनेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस आयचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.इनक्लाब गुलामअली शेख यांच्यावर कागदपत्रात फेरबदल करून न्यायालयाची फसवणूक करून व्यावसायिक गैरवर्तन केलेबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र.4) बारामतीचे न्यायाधिश विशाल वि.देशमुख साहेब यांनी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक यांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिताचे कलम 379(3)(ब) नुसार भारतीय न्याय संहिताचे कलम 336 व 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी फिरोज गुलामअली शेख व आरोपी राहुल भापकर यांच्यात भा.द.वि.कलम 138 नुसार खटला मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र.4) बारामती यांचेसमोर सुरू होता. फिर्यादीचे वकील ॲड.इन्क्लाब गुलामअली शेख हे तर आरोपीतर्फे ॲड.शहानुर शफिर शेख हे काम पाहत होते.
दि.9 ऑगस्ट 2023 रोजी आरोपी व त्यांचे वकील न्यायालयात हजर नसताना, फिर्यादी व त्यांचे वकील ॲड.इन्क्लाब शेख यांनी तोतया इसम उभा करून आरोपीने फिर्यादीस रक्कम रूपये 10,000/- रोख दिल्याबाबत अर्ज दाखल केला. या अर्जावर आरोपीची अथवा त्यांचे वकील ॲड.शहानुर शेख यांची कुठेही सही नव्हती. अशी तक्रार आरोपी राहुल भापकर यांनी न्यायालयात दाखल केली होती.
विशेषतः सदरचे प्रकरण दाखल करताना फिर्यादीच्या वकिलांची म्हणजे ॲड.इन्क्लाब शेख किंवा ॲड.रिजवान इन्क्लाब शेख यांची सही नव्हती. इन्क्लाब शेख यांचे नाव व सही सुद्धा नव्हती. दि.2 जुलै 2024 रोजी आरोपीचे वकील शहानुर शेख यांनी फिर्यादीच्या वकिलांचे अर्थात ॲड.इन्क्लाब शेख व ॲड.रीजवान शेख यांचे वकीलपत्र नसल्याने त्यांना बोलण्याचा हक्क व अधिकार नसलेबाबत हरकत घेतली.
ही बाब फिर्यादीचे वकील ॲड.इन्क्लाब शेख व ॲड.रिजवान शेख यांच्या लक्षात आलेनंतर स्वतंत्र वकीलपत्र दाखल न करता किंवा न्यायालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ॲड.रिजवान शेख यांनी (निशाणी नं.2 वकीलपत्र) वकीलपत्रावर सही केली तर ॲड.इन्क्लाब शेख यांनी नाव टाकून वकीलपत्रावर सही केली. ही बाब आरोपीचे वकीलांनी निशाणी नं.36 प्रमाणे पुरसीस देवून न्यायालयास कळविली.
आरोपीच्या वकीलांनी हा सर्व प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर फिर्यादी, फिर्यादी वकील ॲड.इन्क्लाब शेख, ॲड.रिजवान शेख यांनी आरोपीच्या वकिलांना शिवीगाळ करून, मारहाण केली. याबाबत आरोपीच्या वकीलांनी रितसर बारामती शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.
चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे ॲड.इन्क्लाब शेख यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले न्यायालयाचे संबंधित कर्मचारी यांचेकडून दुर्लक्ष झाल्याचे व कार्यालयीन चूक झाल्याने फिर्यादी व त्यांच्या वकिलांना जबाबदार धरता येणार नाही असे म्हणून खांद्यावरील जबाबदारी झटकून मोकळे झाले.
फिर्यादीचे वकील ॲड.इन्क्लाब शेख यांनी न्यायालयाची दिशाभूल करीत मे.आपटे कोर्ट यांनी दि.16 मार्च 2024 रोजी वकीलपत्रावर सही करण्यास भाग पाडले असे नमूद केले. मात्र, न्यायालयाने या प्रकरणातील रोजनाम्याचे अवलोकन केले असता या तारखेला सदरचे प्रकरण कधीही नेमलेले नव्हते. उलट फिर्यादीचे वकील ॲड.इन्क्लाब शेख हे या न्यायालयाचे पूर्व पीठासीन अधिकारी यांचेबाबत गंभीर स्वरूपाचे खोटे कथन केल्याचे नमूद केले आहे.
न्यायालयाने आरोपीतर्फे युक्तीवाद ऐकून नि.नं.2 वरील वकीलपत्राच्या प्रमाणित प्रतीची सत्यप्रत हे अत्यंत महत्वाचे दस्त असल्याचे त्यांनी नोंदविले आहे. तोतया आरोपीची सही व मूळ आरोपीची निशाणी नं.31 वरील सही प्रस्तुत प्रकरणातील आरोपीच्या इतर सहीसोबत मिळती जुळती दिसून येत नाही. आरोपीच्या वकीलांनी दि.15 मार्च 2024 रोजी वकिलपत्रावर फिर्यादीच्या वकिलांची सही नसल्याची प्रमाणित प्रत न्यायालयात सादर केली.
या सर्व बाबींचा विचार करीत न्यायालयाने ही बाब केवळ अनियमितता व न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय व त्यांच्या ताब्यातील वकीलपत्रावर नाव टाकून सही करणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आरोपीच्या वकिलांनी फिर्यादीचे वकील ॲड.इन्क्लाब शेख यांनी यापूर्वीदेखील व्यावसायिक गैरवर्तन केल्याचे म्हणणे दाखल केले आहे.