लाखो लोकांनी करोना काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार : बारामतीत किती झाले?

मुंबई : करोना काळात खासगीच नव्हे तर पालिका व शासकीय रुग्णालयातही सामान्य रुग्णांवर उपचार करणे टाळले जात होते तेव्हापासून म्हणजे एप्रिल ते 25 सप्टेंबरपर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तब्बल अडीच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये 84 हजार कॅन्सर तर हृदयविकाराचा त्रास झालेल्या 29 हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बारामतीत किती रूग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार झाले याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून कॅन्सर, गर्भवती महिला तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसह वेगेवेगळ्या शस्त्रक्रियांसाठीच्या रुग्णांचे अतोनात हाल झाले. करोना रुग्णांनाही रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी खूप धडपडावे लागले. याच काळात महात्मा फुले जन आरोग्य योजनेने 23 मे रोजी सर्वप्रथम आदेश काढून रुग्णोपचाराची व्याप्ती वाढवली. यापूर्वी पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. तो वाढवून पांढरी शिधापत्रिका असलेल्यांचाही समावेश या योजनेत केल्यामुळे राज्यातील तब्बल 12 कोटी लोक योजनेचा लाभ घेऊ शकत होते.

यापूर्वीच्या योजनेत केवळ 440 रुग्णालयातच उपचार मिळण्याची व्यवस्था होती. ती वाढवून 1000 रुग्णालयात एकूण 996 प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्याची तरतूद केली गेली. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या योजनेत ज्या आजारांचा फारसा लाभ रुग्णांनी घेतला नाही ते आजार बदलून रुग्णोपयोगी आजारांचा नव्याने समावेश करण्यात आला. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना चालविण्यात येत असून या योजनेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी करोना काळात गर्भवती महिलांच्या बाळंतपणासह आवशयक 67 प्रकारच्या चाचण्या व उपचाराचाही या योजनेत नव्याने समावेश केला. त्याचा फायदा 25 हजाराहून अधिक महिलांना बाळंतपणासाठी मिळाला. याशिवाय महापालिका व शासकीय रुग्णालयात गुडघेबदलासह 120 आजारांचा योजनेत समावेश करण्यात आला.

करोनाच्या मागील काही महिन्यात टाटा कॅन्सर रुग्णालयातही साधारणपणे नियमित कामाच्या 40 टक्केच काम होत होते. त्यामुळे कॅन्सर रुग्णांचा एक मोठा वर्ग महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या रुग्णालयांकडे वळला. यात केमोथेरपी अन्य तपासण्या व संदर्भात उपचाराचा लाभ 67 हजार 547 रुग्णांनी घेतला. 6 हजार 706 कॅन्सर रुग्णांच्या शस्त्रक्रिया, 9 हजार 847 रुग्णांवर रेडिएशनचे, 27 हजार 238 रूग्णांवर हृदयविकार शस्त्रक्रिया, 2 हजार 525 हृदयरुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया, मूत्रपिंड विकार, डायलिसीसच्या रुग्णांचे मोठे हाल झाले. या योजनेमुळे तब्बल 44 हजार 378 किडनी विकार रुग्णांना उपचार मिळू शकले. स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारावरील उपचाराची संख्या 22 हजार 935 एवढी आहे. एकूण 9 हजार 307 लहान मुलांवर उपचार करण्यात आले तर लहान मुलांच्या शस्त्रक्रिया या योजनेत केल्या गेल्या. याशिवाय अपघात किंवा अन्य कारणांमुळे हाडं मोडलेल्या 6 हजार 349 रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या तर 6 हजार 292 सामान्य रुग्णांच्या शस्त्रक्रिया करोना काळात पार पडल्या. 3 हजार 558 मेंदु शस्त्रक्रिया मागील पाच महिन्यात करण्यात आल्या असून करोना व्यतिरिक्तच्या वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना वरदान ठरली आहे. आज घडीला महात्मा फुले योजनेत अडीच लाख रुग्णांवर उपचार झाले ही अधिकृत आकडेवारी असून प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त रुग्णांवर उपचार झाल्याचे योजनेच्या एका अधिकार याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!