भिगवण(प्रतिनिधी-योगेश गायकवाड): सध्याच्या धावत्या युगात ऊस वाहतूक करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आत्मा म्हणजे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर नसेल तर शेतकऱ्यांचे हात तुटल्यासारखे होते. हे ट्रॅक्टर चोरणाऱ्या चोरास भिगवण पोलीसांनी चांगल्यास मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार महेश उगले आणि संतोष मखरे यांनी केलेल्या धडक कामगिरीत चोर जेरबंद करण्यात यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी ऊस वाहतूकदार अक्षय अनिल राऊत (रा.केतुर, ता.करमाळा) यांनी बारामती शेटफळ अग्रो कारखाना येथून आपला ट्रॅकटर नंबर एम. एच.45 ए क्यू 3207 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली होती. ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याची झालेली चोरी भिगवण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद महांगडे यांनी गांभीर्याने घेत सदर चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे, सचिन पवार आणि प्रमोद गलांडे यांची टीम नियुक्त करून तपासकामी पाठविले. या टीम ने बारामती अग्रो कारखाना तसेच बावडा व इतर मार्गातील जवळपास 100 च्यावर सीसीटीव्ही चे आकलन करून तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार याच्या माध्यमातून बावडा येथील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. यातील चोरटा सोमनाथ भारत शिंदे वय, 23 रा. शिंदेवस्ती बावडा ता. इंदापूर याला अटक करण्यात आले आहे.
मात्र या चोरट्याने ट्रॅकटरला असणारी जी.पी.एस सेवा भवानीनगर परिसरात काढून टाकल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीस पथकाने संशयित चोरट्याला बोलते केले. त्याने ट्रॅक्टर हा नळग ता.धाराशिव येथे लपविला असल्याचे कबूल केला, पोलीस अंमलदार महेश उगले यांनी लागलीच सदरचा मुद्देमाल ताब्यात घेत कारवाई पूर्ण केली.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे, सचिन पवार, प्रमोद गलांडे यांनी केली.
अनेक ठिकाणाचे सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने केलेल्या कामगिरी मुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.