आरटीईमध्ये अनियमितता व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा – अनिता खरात

इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): आरटीई प्रवेश प्रक्रीयेत अनियमितता व भ्रष्टाचाराची गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी तेजपृथ्वी ग्रुपच्या अनिता खरात यांनी केली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. मात्र, या प्रवेश प्रक्रीयेत धनदांडग्यांनी गरिबांच्या मुलांचा हक्क हिरावून घेवून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे असाही आरोप खरात यांनी केला आहे. लवकरच तेजपृथ्वी ग्रुपतर्फे दूध का दूध, पाणी का पाणी केले जाणार असल्याचेही खरात यांनी सांगितले आहे.

इंदापूर तालुक्यात शिक्षणाचा मूलभूत अधिकार आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील आरटीईसाठी अनेक प्रवेश धनदांडगे व श्रीमंताच्या मुलांची झालेली आहेत. या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश आरटीई मधून मोफत व्हावा यासाठी शाळेच्या जवळपास राहणाऱ्या नातेवाईक, मित्र किंवा काही पैसे देवून तात्पुरत्या स्वरूपात भाडेकरार करून ते दाखवून प्रवेश केलेला आहे. मात्र, ते त्याठिकाणी राहत नाही उलट शाळेच्या ठिकाणापासून 25 कि.मी. अंतरावर राहतात ही खूप मोठी बाब आहे.

काही पालकांनी तर भाडेकरार वेगळ्या ठिकाणचा व लोकेशन वेगळ्याच ठिकाणचे दिले आहे. जे यापुर्वी प्रवेश प्रक्रीयेत पात्र ठरले आहेत त्यांनी भाडेकरार केलेले नाही ते पालक आता भाडेकरार करत आहेत. प्रवेश घेण्यापूर्वीचा भाडेकरार असला पाहिजे. या प्रवेश प्रक्रीयेवर ज्यांचा हक्क आहे ते या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. काहींनी वशिल्याच्या जोरावर, काहींनी अधिकाऱ्यांना चिरीमिरी देवून, बनावट कागदपत्रे बनवून गरीब आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे.

वरील सर्व बाबींची सखोल चौकशी करून पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी म्हणजे सत्य समोर येईल. असे निवेदन ही आज तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

यावेळी अनिता खरात म्हणाल्या की, या प्रवेश प्रक्रीयेची सखोल चौकशी होऊन ज्या पालकांनी खोटी कागदपत्रे सादर केली त्यांच्या कायदेशीर कार्यवाही करावी. जर असे न केल्यास गोर-गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील मुले वंचित राहतील. प्रवेश मिळणेसाठी या लोकांनी खोटी कागदपत्रे, घर मालकांना अमिष दाखवून भाडेकरार केला आहे. यामुळे गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. पालकांचा उद्रेक होण्याअगोदर शिक्षण खात्याने स्पॉट व्हिजिट करून या गोष्टीचा छडा लावावा.

यावेळी सद्दाम बागवान,विशाल म्हेत्रे संदीप रेडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!