मुंबई: महायुतीने तब्बल 235 जागा जिंकल्या आहेत. हा निकाल पाहून सर्वच आश्र्चर्य व्यक्त करीत आहेत. तर, विरोधकांनी मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेवर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मशीनमध्ये कोणीही गडबड करू शकत नाही.
एस. चोकलिंगम माहिती देताना म्हणाले की, ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या समजावून सांगायचे झाल्यास यामध्ये एकूण तीन भाग असतात. पहिले कंट्रोल युनिट, दुसरे बॅलेट युनिट आणि तिसरा भाग म्हणजे व्हीव्हीपॅट मशीन. कंट्रोल युनिटमध्ये एक चिप असते. ज्यामध्ये एक ठराविक प्रोग्राम सेट करून ठेवलेला आहे. कोणीही तो प्रोग्राम बदलू शकत नाही. यामध्ये केवळ मतदानाची आकडेवारी साठवून ठेवली जाते. केवळ उमेदवाराचा नंबर आणि त्याला मिळालेली मते एवढ्याच गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. उदाहरणार्थ एक नंबरचं बटन मतदारांनी किती वेळा, दोन नंबरचं बटण किती वेळा दाबलं. तेवढीच माहिती त्यात साठवलेली असते. या मशीनला उमेदवाराचे नाव, त्याचे निवडणूक चिन्ह माहिती नसतं. परंतु, आपण ज्या उमेदवाराला मत दिले आहे ते बरोबर आहे की नाही? ते मत त्यालाच मिळालं आहे की नाही हे तपासण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन असते.
व्हीव्हीपॅट मशीन म्हणजेच व्होटर-व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल मशीन, आपण ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्यालाच ते मिळाले आहे की नाही हे तपासण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन आणली आहे. यामध्ये उमेदवाराच्या निवडणूक चिन्हासह सर्व माहिती पाहता येते. फक्त व्हीव्हीपॅट मशीनवरच ही माहिती उपलब्ध असते. आपण कंट्रोल युनिटमध्ये कोणतीही माहिती साठवून ठेवू शकत नाही.
ते पुढे म्हणाले की, कुणी जर प्रश्न उपस्थित केला की कंट्रोल युनिटमध्ये जी चिप आहे ती चिप कोणी उघडून बघितली किंवा त्यात फेरफार केले तर काय होईल? यावर ते बोलताना म्हणाले की, ही चिप उघडता येत नाही आणि जर उघडण्याचा कोणी प्रयत्न केला तर ती डिसफंक्शनल होते. म्हणजेच ती मशीन आणि चिप दोन्ही बंद पडेल. पुन्हा सुरू करता येणे शक्यच नाही. यासह मतदानासाठी मशीन मतदान केंद्रावर आणल्यापासून मतमोजणी करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आम्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींना, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तिथे बोलावतो. सर्व प्रक्रिया त्यांच्यासमोर करतो. प्रत्येक टप्प्यातील प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्यानंतर प्रतिनिधिंची स्वाक्षरी घेतो आणि पुढच्या कामाला लागतो.