यापुढे हजारो कोटींची कामे करून घेण्यासाठी नेतृत्व, ताकद व धमक पाहिजे, अधिकार्‍यांना पोरखेळ वाटता कामा नये – अजित पवार

बारामती: यापुढे हजारो कोटींची कामे करण्यासाठी नेतृत्वात ताकद असावी लागते. धमक असावी लागते. उद्या दुसरे कोणी निवडून आले आणि एखाद्या कामासाठी अधिकार्‍यांना फोन करावा लागला तर अधिकार्‍यांनी प्रतिसाद दिला पाहिजे त्यांना तो पोरखेळ वाटता कामा नये असे त्यांनी अप्रत्यक्षपणे युगेंद्र पवारांना लक्ष्य केले.

पवार पुढे म्हणाले की, मी कधीही फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा सोडलेली नाही व सोडणार नाही मात्र विरोधक त्याचा अपप्रचार करीत आहेत. युगेंद्र पवार आपल्याला मुलासारखे असून टीका-टिप्पणी करायची नसल्याचे ते म्हणाले. मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहेत. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांवर एकमेकांवर टीका करतोय असे होईल. ते मला करायचे नाहीये. मी पुन्हा सांगतो की भावनिक होऊ नका.

निवडणूका झाल्यानंतर मी काकींना विचारणार आहे की मला तुम्ही 1991 पासून आमदार-खासदार केले. तेव्हापासून प्रतिभाताई कधी बाहेर आल्या आहेत का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. आत्ता ही बाब विचारण्याची वेळ नाही, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी यावेळी केली.

आपल्या बारामतीत आपण एवढ्या निवडणुका लढवल्या, पैसे देवून लोकं आपण कधी आणलेली नाहीत. काल मला कळलं की सभेला त्यांनी महिलांना 11 वाजता 500 रुपये देऊन बसवलं होते. 2 वाजेपर्यंत त्या महिलांना चहा-पाणी काहीच नव्हते. ही बारामतीमध्ये पद्धत नव्हती. आता सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. ठीक आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते तसा खर्च करत आहेत, असा दावा अजित पवारांनी यावेळी बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!