दलित वस्तीचा सामाजिक,आर्थिक व राजकीय स्तर वाढू नये म्हणूनप्रशासकीय इमारतीचे मुख्यद्वार बंदचे षडयंत्र – गौरव अहिवळे

बारामती(वार्ताहर): येथील विकासाच्या नावाखाली गप्पा मारणार्‍यांनी प्रशासकीय इमारतीचे मुख्यद्वार ज्या दिशेने आहे ते बंद करून दलित वस्तीचा सामाजिक, आर्थिक व राजकीय स्तर वाढू नये म्हणून षडयंत्र रचले असल्याचे भारतीय युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका शेजारीच भव्यदिव्य प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर गोर-गरीब, हातावरचे पोट असणार्‍यांची घरे आहेत. सदर इमारतीचे मुख्यद्वार उघडण्यासाठी यापुर्वी सुद्धा विविध संघटनांनी व पक्षांनी मागणी केली होती. सदरचे मुख्यद्वार उघडल्यास येथील राहणार्‍यांचे राहणीमान उंचावेल व आर्थिक परिस्थिती सुधारेल मात्र ती मागणी अद्याप धूळखात पडलेली आहे.

याच रोडवर भव्यदिव्य बसस्थानक बांधण्यात आलेले आहे. या बसस्थानकाचे मुख्यद्वार सुद्धा दुसरीकडे वळवून येथील दलितवस्तीत राहणार्‍यांवर एक प्रकारे अन्याय केल्याचे दिसत आहे. हा केलेला अन्याय म्हणजे विकास म्हणता येईल का? असेही अहिवळे यांनी सांगितले आहे.

नेत्यांची तिसरी पिढी राजकारणात आली. तरीही अतिक्रमणात तिसरी पिढीच आहे हे प्रामुख्याने जाणले पाहिजे. आजपर्यंत कधीही अतिक्रमण नियमित करण्याचे आश्वासन दिले नाही. आपण शेवटपर्यंत अतिक्रमणधारकच राहणार का? हक्काचे घर आजपर्यंत लोकांना मिळाले नाही. अतिक्रमण असल्यामुळे घरकुल योजना मिळत नाही. गृहकर्ज मिळत नाही. निवडणूक लढवता येत नाही. यासर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत का नाही असेही ते म्हणाले.

काही ठिकाणी अतिक्रमण धारकांचा विचार झाला. 300 ते 400 स्क्वेअर फूटचे घर मिळाले. बहुमजली मजली इमारती बांधून त्याला लिफ्ट नाही. अतितातडीच्या वैद्यकीय प्रसंगी काही दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण? या इमारतीत पाण्याची सोय आहे का? बांधकामाचा दर्जा बघितला पाहिजे. असेही विविध प्रश्र्न त्यांनी उपस्थित केले आहे.

अतिक्रमण नियमित करा ही मागणी प्रामुख्याने राहिली पाहिजे.अतिक्रमण मध्ये राहणार्‍या व्यक्तींनी या राजकीय पुढार्‍यांच्या भूलथापांना बळी न पडता आपली पुढची पिढी अतिक्रमणाधारक होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!