बारामती(वार्ताहर): सामाजिक भान व जान जपणारा नेता अजित पवार असल्याचे वक्तव्य दि मुस्लीम को-ऑप बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांनी केले.
बारामती शहरात बारामती विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार अजित पवार यांच्या प्रचारार्थ प्रभाग, वार्डात फिरताना श्री.सय्यद नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते.

ते ठिक ठिकाणी बोलताना म्हणाले की, विशालगड व पुसेसावळीत झालेल्या जातीय दंगलीत महायुतीचा पहिला नेता ज्याने समक्ष जावून पाहणी केली व पिडीतांना आधार दिला. बारामती शहर व तालुक्यातील मुस्लीम समाजासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे उन्नती कर्ज योजना अधिक शैक्षणिक कर्ज योजना असे मिळून तब्बल 30 कोटी रूपये निधी समाजाच्या उन्नतीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या सर्व योजना माझ्यासह माझ्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून बारामती शहर व तालुक्यात राबविण्यात आल्या त्यास अजित पवारांनी मोलाची साथ दिली.

बारामतीत पाच कोटी रूपयांचा शादीखाना उभारण्यात आला आहे. कब्रस्तानसाठी संरक्षण भिंती, ईदगाह मैदान सुशोभिकरण, चॉंदशाहवली दर्गा येथे सभागृह, कुरैशी जमात सभागृह व कब्रस्तान सुशोभिकरण तसेच बारामती तालुक्यातील ज्याठिकाणी कब्रस्तान आहे त्याठिकाणी संरक्षण भिंती व सुशोभिकरण केलेले आहे.
सासवड याठिकाणी राखी पौर्णिमानिमित्त नकळत झालेल्या घटनेबाबत दोन समाजात होणारा वाद अजित पवार यांच्या प्रयत्नातून मिटला. याच ठिकाणी कब्रस्तानचा प्रश्र्न ऐरणीवर येऊन ठेपला होता. एका खासदारांनी मी आर्थिक मदत करतो म्हणून सांगितले होते मात्र, ऐनवेळी हात काढून घेतला. त्यावेळी सुद्धा अजित पवार यांनी मदत करण्याचा धडाडीचा निर्णय घेतला होता मात्र, ज्या-त्या विधानसभेत स्थानिक आमदारांना सोडून कामे होत नाही हा मुद्दा स्थानिक मुस्लीमांनी मांडला.
मुस्लीम समाजाची आर्थिक, सामाजिक उन्नती व्हावी या उद्देशाप्रमाणे राजकीय उन्नतीसाठी त्यांनी बारामतीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकपदासह पक्षातील शहराध्यक्ष, अल्पसंख्यांक सेल वर मुस्लीम समाजाला संधी दिली.
विशेषबाब म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार यांच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या यामध्ये त्यांनी एक जागा मुस्लीम समाजासाठी दिली हे ही खूप मोठी बाब आहे.